जिल्हा सहकारी बँकांची उद्या पुण्यामध्ये परिषद
केरळ आणि काही राज्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे विलीनीकरण राज्य सहकारी बँकमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : सकाळ माध्यम समूह आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील बाणेर रस्त्यावरील ‘यशदा’ येथे शनिवारी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या एक दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेस राज्यातील सहकार विभागातील मान्यवर तज्ज्ञ आणि सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या त्रिस्तरीय वित्तीय रचनेमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे महत्त्वाचे स्थान आहे.
देशातील केरळ आणि काही राज्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे विलीनीकरण राज्य सहकारी बँकमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांच्या विलिनीकरणाच्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. सहकारी त्रिस्तरीय रचनेतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे स्थान अबाधित राहावे, यासाठी परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत सहकारी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणींबाबत सखोल चर्चा होऊन त्यातील निष्कर्ष व उपाययोजना नाबार्ड, राज्य आणि केंद्र सरकार यांच्यासमोर मांडून त्याचा पाठपुरावा करणार आहे .