डॉक्टरने दिली सैनिकांसाठी १ कोटीची देणगी
संरक्षण दलाला एवढ्या मोठ्या रकमेची देणगी देण्याची ही पहिलीच बातमी

लोकवार्ता । प्रतिनिधी
कोल्हापूर मिरजकर तिकटीवरील प्रसिद्ध निर्मल नर्सिंग होमचे डॉ. प्रकाश गुणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सशस्त्र सेना युद्धहानी कल्याण निधीसाठी तब्बल एक कोटी रुपयांची देणगी दिली. नवी दिल्ली येथे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या दालनामध्ये शुक्रवारी त्यांच्याकडे निधीचा धनादेश डॉ. गुणे यांनी सुपूर्द केला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या वैद्यकीय विश्वातील एखाद्या व्यक्तीने संरक्षण दलाला एवढ्या मोठ्या रकमेची देणगी देण्याची ही पहिलीच घटना आहे. याबद्दल गुणे कुटुंबीयांचे अभिनंदन केले जात आहे. मूळचे गडहिंग्लज येथील डॉ. गुणे गेल्या अनेक वर्षापासून मूत्रविकारतज्ज्ञ म्हणून कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत. विविध सामाजिक कार्यासाठी मदतीचा हात देणाऱ्या डॉ. गुणे यांनी या देणगीने एक नवाच आदर्श निर्माण केला. सशस्त्र दलाचे जे जवान युद्धामध्ये जखमी, जायबंदी होतात, त्यांच्या कल्याणासाठी या निधीचा वापर केला जातो.
डॉ. प्रकाश गुणे यांच्या पत्नी अनुराधा यांनी ही कल्पना बोलून दाखविली. त्या म्हणाल्या, आता आयुष्यातील अनेक जबाबदाच्या पार पाडल्यानंतर अशा पद्धतीने राष्ट्रकार्य करण्याची इच्छा मी व्यक्त केली आणि माझ्या कुटुंबीयांनी ती पूर्ण केली.