“आत्मजा फाउंडेशन कडून विध्यार्थी सहायक समितीस दोन कोटी रुपयांची देणगी”
आत्मजा फाऊंडेशनच्या संचालिका प्रीती जय राव यांनी दोन कोटी रकमेची भरघोस देणगी जाहीर केली.
पिंपरी। लोकवार्ता-
“ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत”, “ज्यांचे सूर जूळून आले. त्यांनी दोन गाणी द्यावीत”, “आभाळाएवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे”, ”ज्यांचे जन्म मातीत मळले. त्यांना उचलून वरती घ्यावे” गरजवंतांना असे उचलून घेणारे अनेक दातृत्वाचे हात आजही समाजात आहेत. याची प्रचिती विद्यार्थी सहाय्यक समितीला आली. निमित्त आहे ते मुलींसाठी नवीन वसतीगृह उभारण्याचे. त्यासाठी आत्मजा फाऊंडेशनच्या संचालिका प्रीती जय राव यांनी दोन कोटी रकमेची भरघोस देणगी जाहीर केली.विद्यार्थी सहाय्यक समिती ही गेली 65 वर्ष ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी काम करते. ज्यांना विद्येचे माहेरघर पुण्यात शिक्षण घेण्याची इच्छा आहे. पण, या शहरात राहण्याची व जेवणाची सोय होत नाही अशा मुलांसाठी अत्यल्प दरात सोय करते. समितीचे काम पाहून आत्मजा फाऊंडेशन मागील तीन वर्षांपासून समितीच्या 40 मुलींचे पालकत्व घेऊन त्यांचा पूर्ण खर्च उचलत आहे.

साधारणतः एका वर्षासाठी पंधरा लाख रुपये या मुलींच्या शिक्षणासाठी आणि निवासासाठीचा खर्च आत्मजा फाऊंडेशन करत आहेत. सध्या वसतिगृहात मुलींची राहण्याची क्षमता 350 एवढीच आहे. ही संख्या कशी वाढवता येईल, या दृष्टिकोनातून समितीने नवीन 250 मुलींच्या वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील सर्व कायदेशीर बाबींच्या कागदपत्रांची पडताळणी आत्मजा फाउंडेशनने केली असून समितीचे निधी संकलन सहकारी सिद्धेश्वर इंगळे यांच्या अथक, प्रामाणिक, निस्वार्थी प्रयत्नातून त्यांनी समाजातील अनेक दानशूर व्यक्तीपर्यंत या प्रकल्पाची मुद्देसूद मांडणी केली आहे. त्याचेच सकारात्मक फलित म्हणजे आत्मजा फाऊंडेशनच्या संचालिका प्रीती जय राव यांनी दोन कोटी रकमेची भरघोस देणगी देण्याचे जाहीर केले. त्याशिवाय त्यातील पन्नास लाख रुपये समितीला वसतीगृह निर्मितीच्या पूर्व तयारीसाठी दिले. दरम्यान, सिद्धेश्वर इंगळे यांच्या प्रयत्नामधून नियमित आर्थिक मदत मिळवण्याचे काम होत असते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी संकलन करणाऱ्या समितीच्या कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचा यथोचित सन्मान समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावर हे सर्व श्रेय समितीच्या प्रामाणिक हेतूला, कार्याला पूर्ण करणाऱ्या सर्व घटकांचे आहे असे सिद्धेश्वर इंगळे म्हणाले.
समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, कोषाध्यक्ष संजय अमृते, विश्वस्त तुषार रंजनकर, रत्नाकर मते, प्रभाकर पाटील, सीए कल्पना दाभाडे, अपर्णा घोडके यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे तर माजी विद्यार्थी व हितचिंतक सुनीता सलगर-घोडे, प्रिया गुरव यांच्या सहकार्याने आणि प्रिती राव, जय राव यांच्या सारख्या दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहकार्यातून मुलींच्या नवीन वसतिगृहाची इमारत उभी राहू शकते. भविष्यात अनेक मुलींच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होण्यात मलासुद्धा खारीचा वाटा उचलता आला याचा मनस्वी आनंद आहे अशी भावना सिद्धेश्वर इंगळे यांनी व्यक्त केली.