दीडशे गाढवांची चोरी !
तीनच दिवसात जवळपास दीडशे गाढवांची चोरी केल्याची तक्रार परळी पोलीस ठाण्यात केली गेली आहे.
बीड।लोकवार्ता –
बीड मधील परळी येथून गेल्या तीन दिवसांत जवळपास दिडशे गाढवांची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. मालवाहतुकीचे अवजड काम करणारी गाढवे चोरीला गेल्याने उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सध्या उपस्थित राहिलाय. त्यामुळे तातडीने तपास लावून न्याय द्यावा अशी मागणी तक्रारदार अमोल मोरे, गोिवद लांडगे, संतोष मोहिते, बालाजी बावणे यांच्यासह ३४ जणांनी केली आहे.

परळीत औष्णिक वीजनिर्मिती केंद्र असल्याने राखेपासून वीटनिर्मितीचे अनेक व्यवसाय आहेत. या व्यवसायात मालाची वाहतूक करण्यासाठी वापर केला जात असल्याने या गाढवांनाही बाजारात प्रत्येकी पंधरा हजारापर्यंतचा भाव आहे. २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान शहरातील जवळपास दीडशे गाढवे चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या गाढवांची किंमत जवळपास वीस लाख आहे. तक्रारदारांकडून गाढव खरेदी केल्याचे पुरावे मागितले असून पुरावे मिळल्यानंतर तपासाला गती येईल, असे संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी सांगितले.