‘चित्रपट उद्योगात सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात…’
भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात रामदास आठवले यांचं खळबळजनक वक्तव्य.
पिंपरी। लोकवार्ता-
भारतीय चित्रपट सृष्टीला तातडीने स्वच्छ करण्याची गरज आहे, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी सांगितले. पत्रकार परिषदेला संबोधित करताना आठवले म्हणाले की, चित्रपटसृष्टीत अमली पदार्थांचा सर्रास वापर होत असून त्यात बदल घडवून आणण्याची गरज आहे. तसेच अमली पदार्थांचा वापर करणाऱ्यांना मात्र व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात यावे आणि त्यांना अटक करण्यात येऊ नये किंवा तुरुंगात टाकू नये, असेही मंत्री म्हणाले.

जे व्यसनी आहेत किंवा ड्रग्ज वापरतात त्यांना चांगल्या आरोग्य सेवेसाठी पुनर्वसन केंद्र किंवा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले पाहिजे, त्यामुळे ते सुधारतील असा आमच्या मंत्रालयाचा विश्वास आहे,” असेही आठवले म्हणाले.
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील अंमली पदार्थाच्या मोठ्या प्रमाणातील सेवनाचा मुद्दा समोर आला. आर्यन खानवरील कारवाईत बिलकुल पक्षपातीपणा नसून, त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्यानेच न्यायालय त्याला जामीन देत नसावे. सक्त वसूली संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या छापेमारीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई ही होणारच असल्याचे आठवले म्हणाले.