लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

टिवटिव मुळे राष्ट्रवादीच्या”युवराज्यांची”हेटाळणी

पार्थ पवार यांची ट्विटर नेता अशी हेटाळणी राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.

पिंपरी|लोकवार्ता-

मावळ लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाल्यानंतर गेली अडीच वर्षे गायब झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार आता पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झाले आहेत; मात्र थेट जनतेत मिसळण्याऐवजी त्यांनी ‘टि्वट’वर टिवटिव सुरु केली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांची ‘टि्वट’र नेता अशी हेटाळणी राजकीय वर्तुळात केली जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. निवडणुकीचे रंग भरायला सुरुवात झाली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महापालिकेवर भाजपची मजबूत पकड आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी महापालिका निवडणूक ‘आरपार’ची असणार आहे. महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी जोर लावणार यात वाद नाही. तर, भाजपही मोठ्या ताकदीने निवडणुकीला सामोरे जाईल. पुन्हा सत्ता आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे पुत्र असलेल्या पार्थ यांनी पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून 2019 मध्ये निवडणूक लढविली. त्यात त्यांचा सुमारे पावणेदोन लाख मतांनी पराभव झाला. पण, कोणताही अनुभाव नसताना, पहिल्याच भाषणाचा ‘पचका’ होऊनही पार्थ यांनी चांगली मते मिळविली. पण, पराभवानंतर पार्थ मात्र आजतागायत गायब झाले. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात फिरकले देखील नाहीत. आता पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवारांनी आपले राजकीय अस्तित्व दाखवायला सुरुवात केली; मात्र ते प्रत्यक्षात कुठेच न दिसता ‘टि्वट’वर सक्रिय झालेत.
एकेकाळी अजितदादा बोले आणि पिंपरी-चिंचवड डोले अशी परिस्थिती होती. शहरातील निर्णयात अजितदादांचा शब्द प्रमाण मानला जात होता. पण, 2017 मध्ये राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपची एकहाती सत्ता झाली. त्याला आता पावणेपाच वर्षे पूर्ण झाले. या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षाला लाच प्रकरणी अटक झाली. महापालिका इतिहासात अशी लाजिरवाणी घटना पहिल्यांदाच घडली मात्र त्याबाबतही पार्थ पवार यांनी ‘चूप्पी’ साधली. आता मात्र त्यांना प्रतिक्रिया नोंदविण्याचा उमाळा आला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली. शहर राष्ट्रवादी काँग्रेसची निर्णय प्रक्रिया पार्थ पवारांच्या हाती एकवटली आहे. शहराच्या राजकारणात त्यांनी लक्ष घातल्याचे समर्थक सांगतात. मागील महिन्यात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन दिवसीय दौऱ्यात शहर ढवळून काढले. मात्र, पार्थ पवार यांची अनुपस्थित सर्वांना खटकली. आता मात्र मुंबईत असलेल्या पार्थ यांनी दररोज शहरातील प्रश्नांबाबत ‘टि्वट’ करण्याचा धडाका लावला आहे. मात्र, त्याची कोण दखल घेत नाही. सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेतेही त्याची दखल घेत नाहीत. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

गेली अडीच वर्षे सार्वजनिक क्षेत्रातही कुठेच न दिसणारे पार्थ पत्रकारांनाही उपलब्ध होत नाहीत. नागरिकांशी भेटणे, संवाद साधणे, समस्या समजून घेणे तर दुर्मिळच आहे. याची उत्तरे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना द्यावी लागतात. त्यामुळे तेही अस्वस्थ आहेत. पार्थदादा यांनी शहरात यावे. प्रश्नांच्या मुळाशी जावे. त्या प्रश्नांबाबत आयुक्तांची भेट घ्यावी. प्रश्न मार्गी लावावेत.

सत्ताधा-यांना थेट प्रश्न विचारावेत. आम्हाला पार्थदादांना ‘टि्वट’वरील नेते म्हणून पहायला आवडणार नाही, असे राष्ट्रवादीतील कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत. पार्थ पवार यांचे शहरातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांशीही पटत नाही. तरुण पिढीला घेऊन ते पुढे जात आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेते नाराज आहेत. त्याचा महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजकीय जाणकार बोलतात.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani