“माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कडून अटक”
मुंबई| लोकवार्ता –
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कडून अटक केली आहे .अटक टाळण्यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र याचा काहीही उपयोग झालेला नाही. मुंबईतील ईडीचे अधिकारी सुलतान यांनी सकाळी अकरापासून देशमुख यांची चौकशी सुरू केली होती. दिल्लीतील ईडीचे अधिकारी सत्यव्रतसिंह हे रात्री आठनंतर मुंबईत दाखल झाल्यानंतर देशमुख यांना अटक होणार याची चर्चा झाली होती.

ईडीच्या अटकेच्या कारवाईपूर्वी देशमुख यांनी एक निवेदन प्रसिद्धिस दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपांनंतर ईडी, सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य केले. मला पाठवलेल्या समन्सलाही मी लेखी स्वरूपात उत्तर देत आलो. मा. उच्च न्यायालयाने मला सांविधानिक हक्कांतर्गत विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तरीही मी आज ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहून पुढील चौकशीस सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गेले ४ महिने बेपत्ता आहेत, यातूनच त्यांच्या आरोपांतील खोटारडेपणा समजतो आहे. त्यांच्यावरही अनेकांनी गंभीर आरोप केले आहेत असे अनिल देशमुख म्हणाले.