“पालिकेच्या पाच विषय सभापतींची निवडणूक होणार बिनविरोध”
शिवसेना -राष्ट्रवादी संख्याबळाअभावी स्पर्धेत नाहीत.
पिंपरी | लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाच विषय सभापतिपद समित्यांच्या निवडणुकीसाठी केवळ सत्ताधारी भाजप उमेदवारांचे अर्ज आले आहेत. विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेने उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. विरोधक थंडगार असून, सभापतींची निवडणूक बिनविरोध होणार आहे. अधिकृतपणे १८ नोव्हेंबरला निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी शुक्रवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. या वेळेत केवळ सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरले. भाजपने दोघांना पुन्हा संधी दिली आहे. विधि समितीसाठी स्वीनल म्हेत्रे, सविता खुळे, महिला व बाल कल्याण समितीसाठी शहर सुधारणा समितीसाठी अनुराधा गोरखे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीसाठी प्रा. उत्तम केंदळे आणि शिक्षण समितीसाठी माधवी राजापुरे यांचे अर्ज भरले आहेत.

महापालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. त्यात बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार कामकाज पाहणार आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सभापती भाजपचेच होणार आहेत.