शासकीय रुग्णवाहिका सुविधा सक्षम करा
माजी महापौर राहुल जाधव यांचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन.
पिंपरी । लोकवार्ता-
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे विविध रुग्णालयांत दाखल झालेल्या रुग्णांची संख्यांची दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे, अत्यावश्यक सुविधा असलेल्या रुग्णवाहिका यंत्रणा शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये अपेक्षीत सक्षम नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन रुग्णवाहिका सुविधा सक्षम करावी, अशी मागणी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मंगळवारी गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णाला घेवून जाणारी रुग्णवाहिका पिंपरीतील स्वर्गीय इंदिरा गांधी पुलावर आल्यानंतर बंद पडली. सुमारे तासभराने त्या रुग्णवाहिकेतील रुग्णाला स्थलांतरीत करण्यात आले. त्यामुळे विविध शासकीय रुग्णालयांत सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिकांची देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सर्वसामान्य नागरिकांना रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी शासनाने यासाठी शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवा सुरू केली. बीव्हीजी कंपनीच्या मदतीने ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र आता या रुग्णवाहिका जुन्या झाल्याने तसेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने त्या रस्त्यातच बंद पडत असल्याचे आज पुन्हा एका स्पष्ट झाले. पर्यायी रुग्णवाहिकेची सोय होईपर्यंत रुग्ण आणि त्याचे नातेवाइक यांचा जीव टांगणीला लागतो. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही राहुल जाधव यांनी म्हटले आहे.