२७ वर्षे काम केल्यानंतरही; ‘नया है वह’!
एवढी वर्षे सर्व्हिस झाली तरी देखील सांगितली जाताहेत वेगवेगळी कारणे

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : ‘अहो!, त्या मॅडमचा मला रोजच फोन येतोय. जरा तेव्हढं काम करून टाका ना! किती वेळ लागणार आहे. अर्धा एक तासाचं काम आहे. ते सर्व खरंय साहेब, पण मी नवीन आहे ना!’ ‘तुम्ही नवीन आहात? एवढी वर्षे सर्व्हिस झाली आणि तुम्ही म्हणता नवीन आहे!’ ‘नवीन आहे! म्हणजे, ‘त्या’ विभागात मी २७ वर्षे काम केलंय हो! पण, हा विभाग माझ्यासाठी नवीन आहे. शिकतोय हळूहळू.’ ‘शिकायला कशाला पाहिजे, त्या कामासाठी!, तुमच्या ज्युनिअर’ लोकांना सर्व माहिती आहे.
त्यांच्या मदतीने काम लवकर करून टाका. उद्या त्याबाबतचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मला द्या!’ हा संवाद आहे, महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेत गणल्या जाणाऱ्या एका विभागातील दोन अधिकाऱ्यांमधील असेच किस्से सध्या महापालिकेत घडत आहेत. काही जणांकडून कामाला विलंब होण्याचं कारण, ‘नवीन’ असल्याचं सांगितलं जातंय.
आयुक्त पाटील यांनी दीड महिन्यांपूर्वी एकाच दिवशी ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यानंतर पंधराच दिवसांनी ४२ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला. काहींनी पदाधिकाऱ्यांमार्फत बदली रद्द करण्याचा प्रयत्न केला. तर, काही पदाधिकाऱ्यांनी मर्जीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली रद्द करण्याचे साकडे आयुक्तांना घातले. मात्र, ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे सर्वांचाच नाइलाज झाला. विभाग प्रमुखांनी सांगूनही कामाची चालढकल करीत असल्याचे दिसून येते. याचे प्रत्यक्ष उदाहरण महापालिका मुख्यालयातील एका अत्यावश्यक सेवेत गणल्या जाणाऱ्या विभागात बघायला मिळाले.
वरिष्ठ अधिकाऱ्याला महिला पदाधिकान्यांचा रोज फोन येत होता. त्यांच्या भागातील, ‘समस्या सोडवा, लोक आम्हाला विचारतात, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, वारंवार सांगूनही, त्या भागाची माहिती नाही. त्या कामाचा ले आउट मिळत नाही. संबंधित ज्युनिअर सुटीवर आहे,’ अशी कारणे संबंधित अधिकाऱ्याने सांगितली. शिवाय, ‘या विभागात मी नवीन आहे साहेब’ असेही ऐकवले. त्यांचे म्हणणे ‘खरे की खोटे’ हे त्यांनाच माहिती. पण, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यापासून असे किस्से घडत आहेत, हे मात्र नक्की.
नगरसेवकांच्या तक्रारी
महापौर उषा ढोरे व आयुक्त राजेश पाटील हे आठही क्षेत्रीय कार्यालयस्तरांवर आढावा बैठकी घेत आहेत. एका बैठकीत दोन वॉडबाबत चर्चा होते. त्यात नगरसेवक व नगरसेविका वॉर्डातील कामांबाबत तक्रारी मांडत आहेत. त्यावरून शहरातील कामे संथगतीने सुरू असल्याचे स्पष्ट होते.