महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे

लोकवार्ता । प्रतिनिधी
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी विचार केला तर आमचे वरिष्ठ नेते विचार करतील असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

‘१८ महिन्यापासून हेच घसा कोरडा होईपर्यंत सांगतोय. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्या सोबत संघर्ष केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. बाळासाहेबांनी अल्पसंख्याकाचा चांगुलपणावर राजकारण केलं नाही. मान खाली करायची नाही यावर शिवसेनेचे राजकारण होते. पण आता टिपू सुल्तानची जयंती साजरी करायला लागलेत.’ अशी टीका देखील त्यांनी केलीये.
अशा कुठल्याही विषयावर सकारात्मक बोलाल तर सामनात छापून येईल. पोटात गोळा घेतोय असं ते म्हणतील. पण उद्धवजींनी विचार केला तर आमचे वरिष्ठ नेते विचार करतील,’ असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
‘सत्ता हा लोहचुंबक असतो त्याकडे जातात. कारवाई होतेय म्हणून त्यांनी हे पत्र लिहलं नसावं. अशा विषयावर बोललं की पोटात दुखायला लागलंय. त्यात डॉक्टर पोट चेक करायला लागलेत.’ असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी भाजपशी जुळवून घ्या. असा सल्ला दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.