लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

अफगाणिस्तान: ..म्हणून राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी सोडला देश; फेसबुक पोस्टद्वारे केल्या भावना व्यक्त

चार वर्ष अफगाणिस्तानमध्ये अडकून, भारतानेही मदत केली पण…

Afghanistan President Dr Najibullah

लोकवार्ता । प्रतिनिधी

“मी तिथेच थांबलो असतो तर अफगाणी जतनेच्या डोळ्यांसमोरच त्यांनी निवडून दिलेल्या राष्ट्राध्यक्षाला पुन्हा फासावर लटकवलं असतं,” अशी भीती अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये व्यक्त केली आहे. घनी यांच्या या वक्तव्यातील पुन्हा या शब्दामुळे यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षाला अफगाणिस्तानमध्ये फासावर लटवण्यात आलं होतं असा प्रश्न काहींना पडलाय. मात्र घनी यांनी केलेल्या वक्तव्यामधील हा पुन्हा शब्द २५ वर्षांपूर्वीच्या अफगाणिस्तानच्या इतिहासातील त्या काळ्या दिवसाकडे लक्ष वेधत आहे. तो दिवस होता २७ सप्टेंबर १९९६.

१९९६ साली २७ सप्टेंबर रोजी तालिबान्यांनी पहिल्यांदा अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी रक्तरंजीत युद्ध केलं त्यामध्ये एका राष्ट्राध्यक्षाची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या राष्ट्राध्यक्षांचं नाव होतं मोहम्मद नजीबुल्लाह. सध्या अफगाणिस्तानमध्ये पायउतार व्हावं लागल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे चर्चेत असले तरी असा प्रसंग ओढावलेले ते अफगाणिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष नाही. यापूर्वी तालिबानने जेव्हा अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवलेली तेव्हा त्यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांना ताब्यात घेतलं होतं. याच इतिहासाच्या पार्श्वभूमीवर रक्तपात टाळण्यासाठी देश सोडला असं घनी यांनी म्हटलं होतं. “सशस्त्र तालिबानला राजप्रासादात घुसून हिंसाचार करू द्यायचा, की प्रिय देश सोडून जायचे असे दोन पर्याय होते. जर मी तेथेच राहिलो असतो तर तालिबानने हिंसाचार करीत आणखी लोकांना ठार केले असते. काबूल शहराचा विध्वंस झाला असता व साठ लाख लोकांना त्यामुळे आणखी धोका निर्माण झाला असता,” असं घनी यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं. घनी यांना देश सोडून पळून जाण्यात यश आलं असलं तरी नजीबुल्लाह मात्र एवढे नशीबवान ठरले नाहीत. त्यांचा मृत्यू खरोखरच रक्तपात घडवून आणल्याप्रमाणे झाला.

कोण होते मोहम्मद नजीबुल्लाह?
मोहम्मद नजीबुल्लाह हे पेशाने डॉक्टर होते. त्यांनी कम्युनिस्ट विचारसणीने प्रभावित होऊन राजकारणामध्ये प्रवेश केला. सोव्हिएत रशियाचं यश पाहून ते या विचारसरणीमुळे प्रबावित झालेले. त्यावेळी युएसएसआरच्या मदतीने अफगाणिस्तानमध्ये काही प्रमाणात कम्युनिस्ट सरकार सत्तेत होतं. मॉस्कोच्या आर्शिर्वादाने नजीबुल्लाह अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झालं. मात्र नंतर अंतर्गत गोंधळामुळे युएसएसआरचं विभाजन झालं आणि अनेक छोटे देश निर्माण झाले. १९९० ते ९१ दरम्यानचा हे घडलं.

युएसएसआरनंतर अफगाणिस्तान…
रशियाची अफगाणिस्तानवरची पकड सैल झाल्यानंतर नजीबुल्लाह यांनी अफगाणिस्तानची धर्मनिरपेक्ष प्रतिमा वगळण्याचा निर्णय घेत आधीप्रमाणे देशाचं नाव रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान असं ठेवलं. युएसएसआरने अफगाणिस्तानमध्ये लक्ष घालण्याआधी देशाचं नाव डेमोक्रॅटीक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान असं होतं. नजीबुल्लाह यांनीच देशाचा धर्म हा इस्लाम असेल अशी घोषमा केली. मात्र यामुळे इस्लामिक मुज्जाहिद्दीनचं समाधान झालं नाही. त्यांनी नजीबुल्लाह सरकारला विरोध सुरु ठेवला.

चार वर्ष अफगाणिस्तानमध्ये अडकून, भारतानेही मदत केली पण…
१९९२ पर्यंत तालिबानने काबूलवर ताबा मिळवला. नजिबुल्लाह यांनी राजीनामा दिला. त्यांनी भारताकडे मदत मागितली होती. आपण तालिबानच्या हाती लागू अशी भिती असल्याने त्यांनी भारताकडे मदत मागितली होती. भारतानेही त्यांना मदत केली होती मात्र ऐनवेळी त्यांना विमानामध्येच चढू दिलं नाही. सुरक्षारक्षकांनी नजिबुल्लाह यांना विमानात चढण्यापासून रोखलं. नजिबुल्लाह यांचे कुटुंबाने काही महिन्यांपूर्वीच भारतामध्ये आश्रय घेतला होता. त्यानंतर काबूलमध्ये अडकून पडल्याने नजिबुल्लाह यांनी संयुक्त राष्ट्रांच्या छावणीमध्ये आश्रय घेतला आणि ते तिथे १९९६ पर्यंत राहत होते. दरम्यान तालिबानने ताजिक नेता अहमद शाह मसूदच्या फौजांशी लढाया करुन संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला. मसूदच्या नॉर्थ अलायन्स नावाच्या फौजांना तालिबानने पराभूत केलं आणि संपूर्ण काबूल ताब्यात घेतलं. यावेळी अफगाणिस्तानमधील अनेक नेत्यांनी पळ काढला.

तालिबानचा जन्म…
युएसएसआर पडल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अराजक निर्माण झालं. सरकारी कामांमधील भ्रष्टाचार फोफावला. लष्करामध्येही भ्रष्टाचाराने पाय पसरले. त्यानंतर रशियाविरोधात आवाज उठवणाऱ्या मुज्जाहिद्दीनमधील काही जणांनी एकत्र येऊन अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवण्यासाठी तालिबानच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले. रशियामध्ये उडलेल्या गोंधळानंतर अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये फारसा रस राहिला नाही. त्यामुळेच पाकिस्तानने तालिबानला पाठिंबा दिला. त्यानंतर तालिबानने सरकारी यंत्रणांना पराभूत केलं. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सर्व गोष्टी सुरळीत करु असा शब्द दिल्याने ते सत्तेत येण्याआधी लोकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला.

घनी २०१४ पासून तालिबानशी करतायत चर्चा…
घनी हे अर्थशास्त्रज्ञ असून ते अफगाणिस्तानचे १४ वे अध्यक्ष होते. ते २० सप्टेंबर २०१४ रोजी पहिल्यांदा निवडून आले व नंतर २८ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची फेरनिवड झाली. गेल्या वर्षी मार्चमध्ये गुंतागुंतीच्या निवडणूक प्रक्रियेत त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते. आधी ते काबूल विद्यापीठाचे कुलपती होते, नंतर काही काळ देशाचे अर्थमंत्रीही होते. घनी हे २०१४ पासून तालिबानशी चर्चा करत आहेत. मात्र त्यांना यामध्ये यश आलं नाही. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे तीन लाख सैन्याचं बळ होतं तरी नजीबुल्लाहच्या कालावधीप्रमाणे सध्या अफगाणिस्तानमध्ये भ्रष्टाचार वाढलाय. म्हणूनच आज अफगाणिस्तान पुन्हा तालिबानच्या हाती गेलाय.

…पण तसं घडलच नाही आणि नजिबुल्लाह यांची हत्या झाली
मसूदने नजिबुल्लाह यांना पळून जाण्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. मात्र आपण पश्तून असल्याने तालिबान आपल्याला ठार मारणार नाही असा विश्वस नजिबुल्लाह यांना होता. पश्तून नेत्यांनीच तालिबानची स्थापना केल्याने नजिबुल्लाहला हा विश्वास होता. मात्र तसं घडलं नाही. तालिबानने संयुक्त राष्ट्रांच्या छावणीमध्ये प्रवेश केला आणि २७ सप्टेंबर १९९६ रोजी नजिबुल्लाहला ताब्यात घेतलं. त्यांनी नजिबुल्लाह यांना फरफटत बाहेर आणलं. त्यांचा छळ केला. त्यानंतर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं आणि त्यांचा मृतदेह काबूलमधील राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यासमोरच्या सिग्नलवर टांगला.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani