तळेगावच्या ‘मिसाईल’ प्रकल्प बाधित शेतक-यांना मिळणार न्याय
-खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट.
पिंपरी । लोकवार्ता-
मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे येथील शेतक-यांची जमीन संरक्षण विभागाने मिसाईल प्रकल्पांसाठी संपादित केली. परंतु, काही शेतक-यांना आजतागायत मोबदला मिळाला नाही. बाजार भावानुसार मुल्य वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासंदर्भात आपण पुढाकार घेऊन संरक्षण मंत्र्यांशी बैठक घ्यावी. त्यातून तोडगा काढावा अशी मागणी, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. त्यावर लवकरात-लवकर संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेऊन मिसाईल प्रकल्प बाधित शेतक-यांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. त्यामुळे बाधित शेतक-यांना न्याय मिळेल असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
पालखी मार्गाच्या देहूरोड हद्दीतील कामासाठी संरक्षण विभागाने जागेचा ताबा देण्यासाठी आपण संरक्षण मंत्र्यांशी चर्चा करावी अशीही मागणी केली. खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. खासदार बारणे म्हणाले, तळेगाव शेलारवाडीतील शेतक-यांची जागा संरक्षण विभागाने मिसाईल प्रकल्पासाठी घेतली. 16 ऑगस्ट 2004 रोजी भूसंपादन सुरू करण्यात आले. 16.83 कोटी रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली. त्याविरुद्ध जमीन मालकांनी अनुकंपा वाढीसाठी पुणे जिल्हा न्यायालयात 93 खटले दाखल केले, जे अद्याप प्रलंबित आहेत. विस्थापित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी 11.27 कोटी रुपयांचे वितरण स्वीकारण्यास जमीन मालकांनी संयुक्तपणे नकार दिला. नुकसान भरपाईबाबतही बाधितांनी नाराजी व्यक्त केली.

काही शेतक-यांना आजतागायत पैसे मिळाले नाहीत. याबाबत तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्यासोबत एक बैठक झाली होती. शेतक-यांच्या मागणीनुसार जमीनीचे बाजार भावानुसार मुल्य वाढवून दिले जाईल. अधिकचे 108 कोटी देण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचे सितारामन यांनी सांगितले होते. परंतु, शेतक-यांनी न्यायालयातील याचिका मागे घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी केली होती. प्रति 15 लाख रुपये अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. एकर (37.50 लाख प्रति हेक्टर) केले होते. याबाबत काही दिवसांपूर्वी शेतकरी मला भेटले होते.
बाजारमुल्यानुसार पैसे मिळत असतील तर शेतक-यांनी याचिका मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे.संपादित केलेल्या जमिनीवरील बांधकामाची भरपाई, बाधित शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या भूमिहीन मजुरांच्या 26 भूमिहीन कुटुंबांचे पुनर्वसन करावे. पुण्यातील संरक्षण आस्थापनामध्ये प्रत्येक बाधित कुटुंबातील किमान 1 व्यक्तीला रोजगार द्यावा अशा शेतक-यांच्या मागण्या आहेत. तुम्ही महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहात. त्यामुळे तुम्ही यात पुढाकार घ्यावा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बैठक घेऊन बाधित शेतक-यांना मागणीनुसार परतावा देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. देहूवरुन संरक्षण विभागाच्या जागेतून पालखी मार्ग येतो. पण, संरक्षण विभागाने जागा ताब्यात दिलेली नाही. त्यामुळे पालखी मार्गाचे काम रखडले आहे. त्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत बैठक घ्यावी अशी मागणीही बारणे यांनी केली.
त्यावर नितीन गडकरी म्हणाले, ”न्यायालयातील याचिका मागे घेण्याबाबतचे शेतक-यांचे पत्र आणा. त्याबाबत संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक लावली जाईल. तळेगावच्या मिसाईल प्रकल्प बाधित शेतक-यांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाईल. पालखी मार्गाला जागा देण्यासाठी चर्चेतून मार्ग काढला जाईल”, अशी ग्वाही गडकरी यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.