फेसबुक कंपनी च नवीन नाव आता “मेटाव्हर्स”
मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीच्या नवीन नावाची घोषणा करताना म्हटलं की, त्यांची कंपनी आता मेटाव्हर्स म्हणून ओळखली जाईल.
लोकवार्ता-
फेसबुकने आपल्या मूळ कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ असे केले आहे. असं असलं तरी फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे कायम राहणार आहेत. कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीपासून “मेटाव्हर्स कंपनी” बनणार आहे आणि “एम्बेडेड इंटरनेट” वर काम करेल, जे वास्तविक आणि आभासी जग एकत्र करेल, असे फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे.
जर तुम्ही Facebook वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी काहीही बदलणार नाही, असे स्वतः कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं आहे. इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी आणि व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठीही हेच आहे. ते वापरत असलेल्या वेबसाइट आणि अॅप्स त्यांची जुनी नावे कायम ठेवली जातील. त्यांचा वापरही तसाच असेल.

जाणून घेऊया हे मेटाव्हर्स आहे तरी काय ?
मेटाव्हर्स हा जरी नवीन शब्द वाटत असला तरी हान खूप जुना शब्द आहे .नील स्टीफन्सन यांनी 1992 मध्ये त्यांच्या डायस्टोपियन कादंबरी “स्नो क्रॅश” मध्ये याचा उल्लेख केला होता. स्टीफन्सनच्या कादंबरीमध्ये, मेटाव्हर्सचा अर्थ असा होता की ज्यामध्ये लोक हेडफोन्स आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी यांसारख्या गॅझेट्सच्या मदतीने गेममधील डिजिटल जगाशी जोडलेले असतात. मेटाव्हर्स आधीच गेमिंगसाठी वापरला जात आहे.
मेटाव्हर्समध्ये क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर,मेटाव्हर्स हे इंटरनेटचे एक नवीन जग आहे जिथे लोक उपस्थित नसले तरीही ते उपस्थित असतील. अजून वेगळ्या पद्धतीने सांगायचं झालं तर, मेटाव्हर्स म्हणजे व्हर्च्युअल रिएलिटीद्वारे उभं करण्यात आलेलं किंवा निर्माण केलेलं असं एक जग जिथे तुमचा एक डिजिटल अवतार असेल आणि कॉम्प्युटरने निर्माण केलेल्या या जगाचा इतर युजर्ससोबत तुम्ही अनुभव घेऊ शकाल. एकमेकांशी जोडले जाल. या मेटाव्हर्सची अजून नेमकी अशी एक व्याख्या नाही किंवा तशी कुणी लिहिलेली नाही. पण यामध्ये तुमचं प्रतिनिधित्वं करणारा तुमचा एक 3D अवतार असेल, असं म्हटलं जात आहे.