राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा : मुरलीधर मोहोळ
अजित पवार यांनी दिलगिरीही व्यक्त केली

लोकवार्ता । प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संबंधित कार्यालयाच्या उद्घाटनाचे आयोजक पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पुण्यात काल राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान, प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्याचे महापौर याबाबत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
याप्रकरणी या कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त करत गर्दी पाहून गाडीतूनच परत जाणार होतो, असं म्हणत दिलगिरीही व्यक्त केली आहे.
एकीकडे उपमुख्यमंत्री नागरिकांना या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या कार्यक्रमात नियमांची पायमल्ली होत असल्याने विरोधकांकडून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.