राज्यातील पहिला बंद; राज्यपालांच्या विरोधात ८ तारखेला पिंपरी चिंचवड शहर बंदची हाक
लोकवार्ता: शिवरायांसह राष्ट्रपुरुषांबद्दलच्या वक्तव्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा टिकेचे धनी झाले. औरंगाबादेतील वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात अगदीच रान पेटले आहे. सर्वच स्तरातून राज्यपाल हटावच्या मागणीने जोर धरलेला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे संकेत दिले आहेत. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी आझाद मैदानावर विराट मोर्चाची हाक दिली आहे. राज्यपाल हटवण्यासाठीच्या राजकीय हालचाली सुरू असतानाच पिंपरी चिंचवडमधील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे. येत्या 8 तारखेला हा बंद पुकारण्यात येणार आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या विरोधात सुरू असलेला विरोध अजून ही संपताना दिसत नाही. आता पिंपरी चिंचवडमधल्या सर्व संघटनांनी एकत्र येत येत्या 8 तारखेला पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये विविध संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. अर्थात या बंदला भाजपचा पाठिंबा नसणार आहे.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाही आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाने सात दिवस राज्यात आंदोलन करणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवणार आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज पहिलं आंदोलन मंत्री अतुल सावे यांच्या औरंगाबाद येथील घरासमोर केलं. मराठा क्रांती मोर्चाने ढोल वाजवत राज्यपाल हटावचा नारा दिला. काळी टोपी हाय हाय, राज्यपाल हटवलेच पाहिजे, अशा घोषणाही त्यांनी दिल्या.
यावेळी सावे यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. त्यांचं म्हणणं ऐकलं. त्यांचं निवेदन स्वीकारलं. तसेच तुमचं निवेदन पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था मी करतो, असं सावे म्हणाले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.