निवडणुकीसाठी राष्ट्रवादी प्रथमच देणार प्रत्येक प्रभाग आणि वॉर्डालाही अध्यक्ष
-अजित पवार करणार जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर.
पिंपरी । लोकवार्ता
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रभाग आणि वॉर्ड रचनेवर भर देण्याचे ठरवले आहे. प्रभाग तथा वॉ़र्ड सक्षमीकरणावर भर देणारी सहाशे जणांची जंबो शहर कार्यकारिणी राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या (ता.३) जाहीर केली जाणार आहे.
पिंपरी महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीनेही तय्यारी सुरु केली आहे.भाजपला जशास तसे उत्तर नव्या शहर कार्यकारिणीतून देण्याचे राष्ट्रवादीने ठरविले असल्याचे पक्षाच्या एका नेत्याने आज ‘सरकारनामा’ला सांगितले. विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटने केल्यानंतर अजित पवार पक्षाचा मेळावा उद्या दुपारी घेणार आहेत. त्यात ते त्यात आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे समजते.

माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील आणि महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांची आधीची कार्यकारिणी पाचशेची होती. मात्र, वाघेरेंच्या अध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झाल्याने आणि गेलेली महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळविण्याच्या हेतूने राष्ट्रवादीने शहरातील भाकरी फिरवली. नवीन शहराध्यक्ष, महिलाध्यक्ष आणि युवक शहराध्यक्ष १२ फेब्रुवारीला दिले.आता त्यांची नवी कार्यकारिणी उद्या जाहीर केली जाणार आहे. ती सर्वसमावेशक व्हावी म्हणून त्यात अजितदादांनी दोनदा बदल केल्याचे समजते. ही कार्यकारिणी आधीपेक्षा मोठी म्हणजे सहाशेची असणार आहे.