लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

माजी मंत्री शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका! मुलीच्या आरोप; भावांनी संपत्तीच्या लोभापायी केली दयनीय अवस्था…

दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही

लोकवार्ता । प्रतिनिधी

शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वादातून त्रस्त असल्याची माहिती मिळत आहे. विजय शिवतारे यांचा मोठा मुलगा विनय शिवतारे त्यांच्या फेसबुक खात्यावरून गेल्या अनेक दिवांपासून विजय शिवतारेंबाबत काही वादग्रस्त पोस्ट करत होता. परंतु त्यावर त्याचे खाते हॅक झाले असल्याचे स्पष्टीकरण विजय शिवतारे देत होते. परंतु आता हे खाते त्यांचा मुलगा विनय हाच चालवत असून त्यांनी हा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आणल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान या कौटुंबिक कलहातून ते गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक त्रासाला सामोरे जात असल्याची माहिती त्यांची मुलगी ममता शिवदीप लांडे-शिवतारे यांनी दिली. याच त्रासामुळे त्यांना आज हृदयविकाराचा झटका आला. विजय शिवतारे यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला होता. मुलगी ममता लांडे-शिवतारे यांनी त्यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पहाटे २ वाजता दाखल केले. यावेळी ममता लांडे यांनी हॉस्पिटलमधूनच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपले भाऊ विनय शिवतारे व विनस शिवतारे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे.

ममता शिवदीप लांडे-शिवतारे यांची फेसबुक पोस्ट
मी ममता शिवदीप लांडे-शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत क्वचितच मला पाहिले असेल. मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठ्ठ कारण आहे. बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य. मला त्यांनी फुलासारख जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिल. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरच स्थान आहे. अश्या माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अवस्थ आहे.

मागील काही दिवसात फेसबुक वरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल अस त्यांना वाटत होतं व आजही वाटतं.

मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहीतच आहे . डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असे सांगितले. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागिल दीड वर्ष्यापासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात.

या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही ? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून , त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सूरु झाले. आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती.

मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनय च्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता.

तो आताही अश्याच बदनामीच्या धमक्या देत आहे. आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलंत. तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका. आणि बाबाही अविरत पुरंदर साठी आपला जीव ओततील .आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. आय सी यु मध्ये रात्री २:०० वाजता मी त्यांना घेऊन आली, ऍडमिट केले. माझी देवाला प्रार्थना आहे ,मला बळ दे!

काही प्रश्न आहेत, त्यावर नक्की आपणही सर्वांनी विचार करावा.

१ ) १९९४ साली घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य, आज २७ वर्षानंतर त्या का आठवाव्यात?
२ ) बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने २०१८ पर्यंत का सांभाळला ?
३ ) बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली?
४ )विनय शिवतारे व विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावल?
५) वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली… पण मृत्युशय्येवर असलेल्या वडीलांसोबत असा व्यवहार कीतीही वाईट असले तरी कोणी मुलगा करणे योग्य आहे का ?

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani