खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कचराही मोशीतील कचरा डेपोत
लोकवार्ता : पिंपरी-चिंचवड शहरातील कचऱ्यासाठी मोशी कचरा डेपोची जागा आधीच अपुरी ठरत असतानाच महापालिका प्रशासनाने शहरा लगतच्या देहूरोड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कचराही मोशीतील कचरा डेपोत टाकण्यास परवानगी देऊन कचरा टाकण्यास सुरूवात झाली आहे. एकीकडे पुनावळेतील कचरा डेपोच्या जागेचे भिजत घोंगडे असताना प्रतिदिन मोशीत ३ टन कचऱ्याचा भार वाढला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर चारही बाजूने मोठ्या झपाट्याने विकसित होत असून मोठं मोठे गृहप्रकलूप उभारले जात आहेत. तसेच शहराची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका प्रशासनाची नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविताना दमछाक होत आहे. शहरातील कचराही सातत्याने वाढत असून सध्या प्रतिदिन 1200 टन कचरा निर्माण होत आहे. त्यामुळे मोशीतील कचरा डेपोची क्षमताही संपू लागली आहे.
मात्र, कचरा डेपोसाठी पुनावळेतील जागा ताब्यात घेण्याबाबत महापालिका प्रशासन उदासिन दिसत आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतून गोळा केला जाणारा कचरा निगडी सेक्टर 22 येथील मोकळ्या मैदानात आणि आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतून गोळा केला जाणारा कचरा संत तुकारामनगर येथील लष्कराच्या मोकळ्या जागेत टाकला जात होता. विनाप्रक्रीया टाकल्या जाणाऱ्या या कचऱ्यास वारंवार आग लागण्याच्या घटना घडत होत्या. तसेच कचऱ्याची दुर्गंधी आणि धुर यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रवन निर्माण झाला होता. परिसरातील नागरिकांना अस्थमा, दमा यासारखे श्वसनाचे विकार होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे केली होती.