गौतम अदानी कुटुंबाने दिवसाला कमावले १ हजार २ कोटी !
अब्जाधीशांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर

लोकवार्ता । प्रतिनिधी
गौतम अदानी आणि कुटुंबाने २०२१ मध्ये प्रतिदिन सर्वाधिक १,००२ कोटी रुपये कमावले आहेत. ज्यामुळे ते आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२१ नुसार ५.०५ लाख कोटी रुपये संपत्ती असणारे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत कुटुंब बनले आहेत. तर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने २०२० मध्ये शेवटची यादी जाहीर झाल्यापासून दररोज १६३ कोटी रुपये कमावले असून त्यांची एकूण संपत्ती ७.१८ लाख कोटी रुपये आहे. तर, एलएन मित्तल आणि कुटुंबाने ३१२ कोटी रुपये कमावले असून शिव नादर आणि कुटुंबाने दररोज २६० कोटी रुपये कमावले आहेत.
विनोद शांतीलाल अदानी आणि कुटुंबाने दररोज २४५ कोटी रुपये कमावले, तर कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंबाने २४२ कोटी रुपये कमावले. ते आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या एसपी हिंदूजा आणि कुटुंबाने दररोज २०९ कोटी रुपये कमावले आहेत. दरम्यान, यावर्षी भारताच्या टॉप १० श्रीमंत लोकांमध्ये चार नवीन चेहरे होते, असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अहवालात म्हटले आहे की, ११९ शहरांमधील १००७ व्यक्तींकडे IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२१ मध्ये १००० कोटी रुपयांची संपत्ती आहेत. एकूण ८९४ लोकांची संपत्ती वाढली किंवा समान राहिली आहे. यापैकी २२९ नवीन चेहरे आहेत. तर, ११३ जणांची संपत्ती या वर्षात कमी झाली असून ५१ जण या यादीतून बाहेर पडले आहेत.
भारतात २३७ अब्जाधीश आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५८ जणांची वाढ झाली आहे. नवीन अब्जाधिशांची संख्या ही केमिकल आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात जास्त आहे. तर, फार्मा अजूनही पहिल्या क्रमांकावर असून एकूण अब्जाधिशांपैकी १३० जण फार्मा क्षेत्रातील आहेत. या यादीतील सर्वात लहान अब्जाधिशाचे वय २३ वर्ष आहे. हा अब्जाधिश गेल्या वर्षीच्या सर्वात लहान मुलापेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. महिला संपत्ती निर्माण करणाऱ्यांची वाढ, सरासरी वयात घट आणि पुणे, राजकोट, सूरत, फरीदाबाद आणि लुधियाना सारख्या टियर २ शहरांचा समावेश या यादीतील प्रमुख महत्वाच्या २० शहरांमध्ये आहे, असे आयआयएफएल वेल्थचे संस्थापक, एमडी आणि सीईओ करण भगत म्हणाले.
अब्जाधीशांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि यामध्ये वेगाने वाढ होत आहे. आज भारतात २३७ अब्जाधीश आहेत, जे दहा वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा चार पटीने जास्त आहे. हूरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२१ नुसार श्रीमंतांच्या यादीत चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान वाढ आहे,” असंही जुनैद म्हणाले.