शिवसेनेला संधी द्या, देहूचा कायापालट करु -खासदार श्रीरंग बारणे
-शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ
पिंपरी | लोकवार्ता-
देहू नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने निष्कलंक, तरुण उमेदवार दिले आहेत. त्यांना शहर हिताचे व्हिजन आहे त्यामुळे मतदारांनी शिवसेना उमेदवारांना पसंती द्यावी, शिवसेनेला सत्ता द्यावी. शिवसेनेच्या माध्यमातून विकासकामे करुन देहूगावचा कायापालट केला जाईल, असे आश्वासन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले.
देहू नगरपंचात समितीची निवडणूक 21 डिसेंबर रोजी होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज मंदिरासमोर खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते नारळ फोडून शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे,तालुका प्रमुख राजेश खांडभोर,युवा सेनेचे अनिकेत घुले,देहू शहरप्रमुख सुनिल हगवणे,रमेश हगवणे,भारत ठाकूर,शैलेजा खंडागळे,दत्ता भेगडे,उमेदवार तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार बारणे म्हणाले, शिवसेना पक्षाने देहूगावाच्या विकासाला यापूर्वीही प्राधान्य दिले आहे. देहू नगरपंचायत व्हावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला मुख्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि नगरपंचायत केली. तसेच नगरपंचायतीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला, त्यामुळे विकास कामे झाली. यापूर्वीही मी खासदार फंडातून देहूच्या विकासाठी मोठा निधी दिला आहे.

देहूचे नागरिक हिंदुत्त्वाच्या विचाराशी एकनिष्ठ राहिले आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून विकासकामे करुन देहूगावचा कायापालट केला जाईल. प्रलंबित कामे मार्गी लावले जातील. देशभरातून देहूत येणा-या भाविकांच्या सोई-सुविधांसाठी प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर शिवसेनेने निष्कलंक, तरुण उमेदवार दिले आहेत. त्यांना शहर हिताचे व्हिजन आहे. त्यामुळे मतदार शिवसेना उमेदवारांना पसंती देतील. येणा-या कालावधीत शिवसेनेच्या माध्यमातून विकासात्मक कामे करण्याची ग्वाही खासदार बारणे यांनी दिली.