चऱ्होलीतील महिलांचा ई-क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा
-पाणी प्रश्नाला कंटाळून विनया तापकीर यांच्या नेतृत्वाखाली काढला मोर्चा
चऱ्होली। लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट असणाऱ्या चऱ्होली मध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने त्यांना विविध अडचणी ना सामोरे जावे लागत आहे. त्याचा उद्रेक होवून त्यांनी सोमवारी (दी.१४) ई क्षेत्रीय कार्यालयावर संतप्त महिलांनी हंडा मोर्चा काढत पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.

सध्या चऱ्होलीमध्ये विविध विकास कामावरून श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे दिसत आहे. त्यावरून समाज मध्यमावरून एकमेकाला टार्गेट केले जात असल्याचे पहावयास मिळत आहे. लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत; परंतु ज्या करदात्यांच्या करातून हा विकास साध्य होत आहेत त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याबाबत लक्ष देण्यास वेळ नसल्याने सर्वसामान्य करदात्या मध्ये असंतोष पसरला आहे. जवळ पास पाच दिवसापासून या प्रभागाच्या विविध भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

त्याचा विपरीत परिणाम याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटी असणाऱ्या शहरात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे ही शोकांतिका आहे. आम्ही काम करायचे की पाण्यासाठी वणवण करायची असा प्रश्न महिलांनी उपस्थीत केला आहे. त्यानुषंगाने माजी नगरसेविका विनया तापकीर यांच्या नेतृत्वाखाली ई क्षेत्रीय कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला. वेळेत पाणी द्या साठी निवेदन दिले. पाणी प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करताना महिलांना अश्रू अनावर झाले होते.