दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या मंत्र्याला भर चौकात फाशी द्या, भाजप आमदार महेश लांडगेंचं वक्तव्य
-अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी देशद्रोही मलिकला अटक नाही, तर भरचौकात फाशी दिली पाहिजे, असे वक्तव्य लांडगे यांनी केले आहे.
पिंपरी | लोकवार्ता-
नवाब मलिकांना मनी लॉंड्रिंगप्रकरणी ईडीने अटक केली आहे. याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. सत्ताधारी असणाऱ्या महाविकास आघाडीकडून मलिकांच्या समर्थनासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या वतीने त्यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. तसेच नवाब मलिक यांच्या राजीनामाच्या मागणी देखील भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. याच पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये देखील उमटले. मलिकांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी पिंपरी चिंचवड भाजपने आंदोलन केले होते. यावेळी बोलताना लांडगे यांनी मलिकांचा एकेरी उल्लेख केला. तसेच बॉम्बस्फोट घडवणाऱ्या देशद्रोही दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या या मंत्र्याला केवळ अटक करून चालणार नाही, तर भर चौकात फाशी द्यायला हवी,असे वादग्रस्त वक्तव्य केले. या लांडगेच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मनी लॉंड्रिंग प्रकरणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी अटक करण्यात आली होती. ईडीने तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायलयात हजर केले असता तीन मार्चपर्यंत ईडीची कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांनी परस्पर विरोधी आंदोलने केली आहेत. महाविकास आघाडी सरकारने ईडी आणि केंद्र सरकारविरोधात टीकास्त्र सोडले. तर भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
