पीसीईटी’चे पंधरा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार’
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी माहिती दिली

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : ‘पीसीईटी’ मधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने जगातील विकसित विविध देशातील नामांकित विद्यापिठांबरोबर ‘पीसीईटी ने करार केले आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी केले.
विश्वस्त हर्षवर्धन पाटील आणि अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी पिंपरी चिंचवड भारत इटली एकत्रित संशोधन प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर सह्या केल्या. यावेळी उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, संचालक डॉ. जी. एन. कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. जान्हवी इनामदार, आंतरराष्ट्रीय संबंध अधिष्ठाता डॉ. अनुराधा ठाकरे तसेच ए. जी. पाटील उपस्थित होते.
पाटील म्हणाले, की युरोप, अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांबरोबर मलेशिया, जपान, इटली, थायलंड, रशिया, युके मधील नामांकित विद्यापीठांबरोबर शिक्षण, संशोधन, उन्हाळी सुट्टीत कौशल्य आधारित संशोधन प्रकल्प, शिक्षण तसेच विद्याथ्र्यांना शिक्षण व संशोधन असे अनेक करार केले आहेत. यामुळे पीसीईटीच्या आणि तळेगाव येथील एनएमआयटीच्या शिक्षक, विद्यार्थ्यांना परदेशात शिष्यवृत्तीसह, अल्पखर्चात शिकण्याची व संशोधनाची संधी मिळेल. यामध्ये अभियांत्रिकीसह व्यवस्थापन व वास्तुविशारद शाखेतील पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना विशेष फायदा होईल.