आरोग्य विभाग मेगाभरतीत ‘मेगा घोडेबाजार’!
शिक्षकाची साडूसह डेप्युटी कलेक्टरमार्फत थेट मंत्रालयात सेटिंग ?
लाखोंची मागणी, एजंटचा सुळसुळाट; परीक्षा पारदर्शक होणार, आरोग्यमंत्र्याचा खुलासा

लोकवार्ता । प्रतिनिधी
आरोग्य विभागामार्फत २५ आणि २६ सप्टेंबर असे दोन दिवस गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गाच्या पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांकडून सेटिंग लावण्याचे काम गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत वशिलेबाजी करून एका पदासाठी १५ ते २० लाख रुपये उकळले जात असल्याचे समोर आले आहे.
याबाबत स्टिंग ऑपरेशन केले असून स्टिंग ऑपरेशन मध्ये एजंटने पदासाठी पैशाची आणि आरोग्य संचालक कार्यालय ते मंत्रालयापर्यंत सेटिंग असल्याचा खुलासा केला आहे. या गंभीर प्रकारामुळे एकूणच भरती प्रक्रिया बोगस पद्धतीने होणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान भरती प्रक्रियेचे कंत्राट दिलेल्या कंपनीकडूनच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट थेट ऊत्तर प्रदेश मधील परीक्षा केंद्र देऊ केल्याने भरती प्रक्रियेत सावळा गोंधळ सुरु आहे असे दिसते. यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला सूचना दिल्याचे स्पष्ट केले.
आरोग्य विभागाच्या ‘क’ वर्गाच्या २७३९ पदासाठी व ‘ड’ वर्गाच्या ३४३६ पदासाठी ऑनलाईन परीक्षा शनिवार (२५) आणि रविवारी (२६) रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी जवळपास ८ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी दिवसरात्र तयारी करत आहेत. मात्र काही विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवण्यासाठी शॉर्टकट मार्ग अवलंबून घोडेबाजार सुरु केल्याने एजंटचा देखील सुळसुळाट झाला आहे. आरोग्य संचालक कार्यालय ते थेट मंत्रायलापर्यंत आपला वशिला आहे. असे सांगून एका पदासाठी पंधरा ते वीस लाख रुपयांची मागणी करत असल्याचे उघडकीस आले आहे.