आळंदीतल्या चिमुकलीचा प्रामाणिकपणा…!
अष्टगंध लावून पैसे जमा करणाऱ्या चिमुकलीला सापडलेलं सोन्याचे मंगळसूत्र दिले थेट पोलिसांकडे.
आळंदी । लोकवार्ता
पालखी प्रस्थान सोहळा काहीच दिवसांवर येऊन थांबला आहे. आळंदीत पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांचा ओघ वाढला आहे. दररोज हजारो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माऊलींच दर्शन घेण्यासाठी येतात.यामध्ये चोरी होण्याची दाट शक्यता असते.यातच नागरिक आपले मौल्यवान वस्तू लपवण्यासाठी रुमालाचा वापर करत असतात.गर्दीमध्ये कोणती वस्तू कधी पडेल हे काही सांगता येत नाही.त्यामुळे मंदिर कमिटी आणि संस्थांकडून वस्तू सांभाळण्याचे निर्देश दिले जातात.

यातच आळंदी मधील चिमुकलीची कौतूस्पद गोष्ट समोर आली आहे. आळंदीत अष्टगंध लावून पै-पै जमा करणाऱ्या एका चिमुकलीचा प्रामाणिकपणा पाहायला मिळाला आहे. या मुलीने तिला आळंदीत सोन्याचं मंगळसूत्र सापडल्यानंतर कोणत्याही लोभाला बळी न पडता ते मंगळसूत्र प्रामाणिकपणे पोलिसांना दिलं. या मुलींचं नाव पूजा भामरे असं आहे. ती दररोज सकाळपासूनच आळंदीत एक-एक रुपयांसाठी माऊलींच्या मुख्य मंदिर परिसरात भाविकांना अष्टगंध लावण्याचा आग्रह करते. कोणी गंध लावतं, तर कोणी नाही. बरेच गंध लावून घेतात, पण पैसे देत नाहीत. असं असताना देखील पूजाने हजारो रुपयांचं सोन्याचं मंगळसूत्र पोलिसांना सुपूर्द केलं. त्यामुळे तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे.