आणखी किती दिवस शहर मंत्रिपदापासून वंचित
लोकवार्ता : आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका, औद्योगिकनगरी, कामगारनगरी, बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी अशी अनेक बिरुदावली मिरवणारे पिंपरी-चिंचवड. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि भोसरी अशा चार ग्रामपंचायतील मिळून दि.४ मार्च १९७0 रोजी पिंपरी-चिंचवड नवनगरची निर्मिती करण्यात आली. मात्र, अद्याप या शहराला एकदाही राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक नेत्यांनी मंत्रीपदे भूषवली, पण पिंपरी -चिंचवड कायम वंचित राहीले.

स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पिंपरी चिंचवड परिसरात औद्योगिक वसाहत विकसित झाली. या औद्योगिकीकरणाचे शिल्पकार म्हणून स्व. अण्णासाहेब मगर यांना ओळखले जाते. ११ ऑक्टोबर १९८२ ला पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाली. शहराच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देणारे स्व. अण्णासाहेब मगर, स्व. प्रा. रामकृष्ण मोरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नावे आदराने घेतली जातात. मात्र ५२ वर्षात शहराला मंत्रिपद मिळाले नाही, ही खंत पिंपरी-चिंचवडकर म्हणून कायम सलते.
शहराचे पहिले आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्यापासून आतापर्यंत किमान 29 महापौर झाले. त्यापैकी एकाही नेत्याला राज्याच्या मंत्रिमंडळात कायम करण्याची संधी मिळाली नाही. त्यांचे पहिले आणि शेवटचे कारण म्हणजे केवळ राजकीय असूया. आपल्यापेक्षा कोणी मोठा झाला नाही पाहिजे ही संकुचित आणि तितकीच आपमतलबी भावना. ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, गौतम चाबुकस्वार अशा दिग्गजांनी विधानसभेत स्थान मिळवले. मात्र मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. वरीलपैकी ज्यांची क्षमता होती, त्यांच्या राजकीय वाटचालीत खोडा घालण्याचे काम याच शहरातील नातलग, गावकी, भावकीने केले, ही वस्तुस्थिती आहे. आपापसातील भांडणात काँग्रेस राष्ट्रवादीच्या पक्ष श्रेष्ठींनी इथली सत्ता मर्जीप्रमाणे चालवली, हाच इतिहास आहे. महापालिकेत आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचे वर्चस्व आहे. जगताप यांची प्रकृती ठीक नाही. अन्यथा जगताप मंत्रिमंडळात प्रभावी दावेदार राहिले असते, हे मान्य करावे लागेल. नैसर्गिक न्याय तत्त्वाने या क्षणाला तरी आमदार महेश लांडगे मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतात, अशी स्थिती आहे.
एखादा नेता, आमदार, खासदार आणि मंत्री बनवण्यासाठी किमान 20 ते 25 वर्षे संघर्ष करीत असतो. एखाद्या नेत्याला मेरिटवर मंत्रिपद मिळवणं आजच्या राष्ट्रीय परिस्थितीत केवळ आव्हानात्मकच आहे. पिंपरी चिंचवडला 52 वर्षात पहिल्यांदा मंत्री पद दृष्टिक्षेपात दिसू लागले आहे. शहराचे नेतृत्व राज्यात करण्याची जी संधी उपलब्ध होईल त्यांच्या सोनं केलं पाहिजे, अशी सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर यांची अपेक्षा आहे. राजकारण, निवडणुका आणि डावपेच होत राहतील, पण पिंपरी चिंचवड शहराच्या अस्मिता टिकली पाहिजे. त्यासाठी सर्व पातळीवर एकोपा दाखवणे हीच खरी शहराची गरज आहे. ‘अन्यथा दोष ना कोणाचा खेळ आपल्या पूर्व संचिताचा’ अशी वेळ पिंपरी-चिंचवडकरांवर आल्याखेरीज राहणार नाही.