लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

भाजप राष्ट्रपती पदाची निवडणूक कशी जिंकणार ?

निवडणुकीसाठी ते सर्व मिळून एकच उमेदवार देखील देऊ शकतात

लोकवार्ता । प्रतिनिधी

२५ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या देशात सर्व विरोधक एकत्र येऊन मोदी सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेच. त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक नक्कीच विरोधकांसाठी प्रतिष्ठेची असेल. या निवडणुकीसाठी ते सर्व मिळून एकच उमेदवार देखील देऊ शकतात. पण, त्यापूर्वी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील ही निवडणूक जिंकणे भाजपसाठी किती महत्वाचं असणार आहे, याचाच आपण आज आढावा घेणार आहोत.

शिवसेनेची भूमिका महत्त्वाची –
राज्यसभेचे ६८ खासदार पुढील वर्षी निवृत्त होणार आहेत. त्याठिकाणी निवडणुका घेण्यात येतील. पण, आजपर्यंतच्या माहितीनुसार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राज्यसभेमध्ये बहुमत मिळाले नाही. तसेच गेल्या काही दिवसांपासून भाजपचा अनेक राज्यांमध्ये पराभव होताना दिसतोय. नुकतेच भाजपने राजस्थान, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये सत्ता गमावली आहे. तसेच शिवसेना आणि अकाली दल हे दोन्ही मित्रपक्ष भाजपपासून दुरावले आहेत. त्यातच आता संयुक्त विरोधक आघाडीमध्ये महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष देखील सक्रीय आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत हे या आघाडीमध्ये सेनेकडून सहभागी होत आहेत. त्यामुळे आता सेना भाजपसोबत जाण्याची शक्यता कमीच असल्याचेही बोलले जात आहे.

पश्चिम बंगालसारखे राज्य भाजपच्या हातातून गेले आहे. तसेच कोरोनामुळे ढासळत असलेली अर्थव्यवस्था, अनेक संकटे, शेतकरी आंदोलन, महागाई, पेगासस हेरगिरी प्रकरण, घोडेबाजार, असे अनेक मुद्दे विरोधकांनी लावून धरले आहेत. याच मुद्द्यावरून सर्व विरोधक मिळून पंतप्रधान मोदींना आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. या मुद्दयांचा भाजपला कुठे ना कुठे तरी नक्की धक्का बसेल, असा विश्वास देखील विरोधकांना आहे. पण, या सर्व गोष्टींचा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो काय?

सत्ताधारी पक्षाचा फक्त एकदा पराभव –
आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर सत्ताधारी पक्षाला फक्त एकदा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला होता. १९६९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार निलम संजीव रेड्डी यांचा पराभव झाला होता. यावेळी व्ही. व्ही. गिरी हे विजयी ठरले होते. पण वर्चस्वाच्या लढाईमुळे हा पराभव पत्कारावा लागला होता, असे राजकीय जाणकार अमिताभ तिवारी ‘द क्विंट’ला लिहिलेल्या लेखात सांगतात. अगदी हीच बाब विरोधकांमध्येही पाहायला मिळते. कारण नुकतेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘आधी नेतृत्व ठरू द्या, मग चर्चा करू’, असे वक्तव्य केले होते. कारण, संयुक्त विरोधक आघाडीचे नेतृत्व कोण करणार? हे ठरलेले नाही. नेतृत्व लवकर ठरले नाही किंवा विरोधकांमध्ये मतभेद कायम असेल तर ही बाब २०२२ च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या पथ्थ्यावर पडू शकते. पण, त्यासाठी उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल देखील महत्वाचा ठरणार आहे.

कशी होते राष्ट्रपतींची निवड? –
सर्वसाधारण निवडणुकीपेक्षा राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया ही वेगळी असते. या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा, एकूण ३० राज्यांच्या विधानसभा व केंद्रशासित दिल्ली व पुदुच्चेरी यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य मतदार असतात. हे सर्व मिळून एका निर्वाचित गणाच्या सदस्यांकडून (इलेक्टोरल कॉलेज) राष्ट्रपती निवडला जातो.

 • लोकसभा सद्स्य – ५४३
 • राज्यसभा सदस्य – २३३
 • राज्य विधानसभांचे एकूण सदस्य – ४१२०
 • एकूण मतदार – ४८९६

यामध्ये विशेष म्हणजे राज्यसभेचे १२, लोकसभेचे दोन व काही राज्य विधानसभांतील आंग्लभारतीय नामनिर्देशित सदस्य व त्याचप्रमाणे ज्या राज्यात विधानपरिषदा आहेत, त्यांच्या सदस्यांना मतदानात भाग घेता येत नाही.

मत मुल्यांकनाची पद्धत –
या सर्व मतांचे मूल्यांकन ठरविले जाते. त्याची देखील एक पद्धत आहे, ते पाहुयात
१) राज्याच्या लोकसंख्येला (१९७१ च्या जनगणनेनुसार) विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्येने भागले असता येणाऱ्या भागाकाराला परत १०००ने भागावे. त्यानंतर त्यामध्ये शेषसंख्या जर पाचशेपेक्षा अधिक असेल तर मतात एकाची वाढ केली जाते.

 • उदा – महाराष्ट्राची लोकसंख्या (१९७१ नुसार) = ५, ०४, १२, २३५
 • आमदारांची संख्या : २८८
 • प्रत्येकाची मते ५, ०४, १२, २३५ / २८८ x १००० = १७५
 • राज्याची एकूण मते १७५ x २८८ = ५०४००
 • याप्रमाणे उत्तर प्रदेशच्या सदस्यांचे मते काढुयात –
 • उत्तप्रदेशची लोकसंख्या = ८३,८४८,७९७
 • एकूण निवडून आलेले विधानसभेचे सद्स्य = ४०३
 • प्रत्येकाची मते = ८३,८४८,७९७/ ४०३ x १०००= २०८
 • अशा प्रकारे सर्व ३१ विधानसभेच्या ४१२० मतांचे मुल्य = ५,४९,४९५

२) राज्य विधानसभा सदस्यांच्या एकूण संख्येस निवडून आलेल्या सर्व खासदारांच्या एकूण संख्येने भागले असता जी संख्या येईल, तितकी मते प्रत्येक खासदाराची असतात. या हिशेबात अर्ध्याहून जास्त असलेले अपूर्णांक हे पूर्णांकात गणले जातात.

आता खासदारांच्या मतांचे मुल्य पाहुयात –
लोकसभा खासदार + राज्यसभा खासदार : ५३३+२३३ = ७७६
प्रत्येक खासदाराचे मतमूल्य : ५,४९,४९५/ ७७६ = ७०८
खासदारांची एकूण मते : ७०८ x ७७६ = ५, ४९, ४०८
इलेक्टोरल कॉलेजमधील एकूण मते = ५,४९,४९५ + ५, ४९, ४०८ = १०,९८,९०३

निवडणुका जिंकण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या मतांपैकी ५०टक्क्यांपेक्षा अधिक वैध मते मिळाली पाहिजे. यावेळी पक्ष त्यांच्या खासदार किंवा आमदारांना व्हिप जारी करू शकत नाही. अशावेळी क्रॉस व्होटींग होण्याची शक्यता असते. हे क्रॉस व्होटींग देखील सत्ताधारी पक्षाला फायदेशीर ठरू शकते.

सद्यपरिस्थिती काय आहे?
सध्या पंजाब, मनिपूर, गोवा, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या पाचपैकी चार राज्यात भाजपची सत्ता आहे. या पाच राज्यांमधून जवळपास इलेक्टोरल कॉलेजच्या ९ टक्क्यांपेक्षा अधिक मत जातात. उत्तर प्रदेश हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महत्वाची भूमिका बजावते. कारण संपूर्ण मतांच्या मूल्यापैकी जवळपास ८ टक्के एकट्या उत्तर प्रदेशातून येतात, असे राजकीय जाणकार अमिताभ तिवारी यांनी ‘द क्विंट’ला लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.

सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास, एनडीएकडे ४९.६ टक्के मते, यूपीएकडे २६.१ टक्का, भाजपविरोधी पक्ष १४.४ टक्के आणि स्वतंत्र पक्षांकडे ९.९ टक्के मते इलेक्टोरल कॉलजमध्ये आहेत.

तसेच लोकसभेत ३ जागा, राज्यसभेत १४ आणि राज्य विधानसभेत १२६ जागा रिक्त आहे. तसेच राज्यसभेच्या १४ जागांपैकी चार या जम्मू-काश्मीरमधील आहेत. पण, याठिकाणी निवडणुका कधी होतील याबाबत कुठलीही खात्री नाही. याचप्रमाणे राज्य विधानसभेच्या ८७ जागा या देखील जम्मू-काश्मीरमधील आहेत. तसेच १९ जागा या पाच राज्यांमधील आहेत ज्या ठिकाणी पुढच्या वर्षी निवडणुका लागणार आहेत. पंजाबमध्ये भाजप वादात नाही. पण, त्यांचे विधानसभेत फक्त दोन आमदार असून त्यांचा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर कुठलाही परिणाम होत नाही. गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये एनडीएची सत्ता आहे. समजा भाजपचा त्या तीन राज्यांमध्ये पराभव झाला. तरीही उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर राष्ट्रपती पदाची निवडणूक अवलंबून असेल, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशची निवडणूक भाजपने जिंकली तर…
उत्तरप्रदेशची निवडणूक ही सर्वात महत्वाची आहे. समजा उत्तर प्रदेशमध्ये भाजपला (२०२) साधं बहुमत मिळालं. क्रासविस्डम३६० च्या सर्वेक्षणानुसार, २७८ जागा सध्या एनडीएकडे आहेत. अशा परिस्थितीत राज्य विधानसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका आणि राज्यसभा फेरनिवडणूक हे सर्व मतं पकडून एनडीएकडे ४६.७ टक्के मतांचा वाटा असेल, युपीएकडे २६.४ टक्के, भाजपविरोधी पक्ष १६.५ टक्के आणि न्युट्रल पक्षाकडे १०.५ टक्के वाटा असेल. अशावेळी युपीए आणि भाजपविरोधी पक्ष एकत्र आले तरी त्यांच्याकडे फक्त ४२.९ टक्के मतांचा वाटा असेल, जे की पिछाडीवर असेल. या आकडेवारीनुसार, स्वतंत्र पक्षाने भाजपला साथ दिली नाही, तरी भाजपचा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय होण्याची शक्यता आहे. जर स्वतंत्र पक्षांनी साथ दिली, तर एनडीए आणि स्वतंत्र पक्षाचा वाटा बघितला ५७.२ टक्के होतो. एखादा वाटा कमी झालाच तर तो ५७.१ टक्के होईल, असेही अमिताभ तिवारी यांनी नमूद केले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा पराभव झाला तर…
काही कारणांमुळे भाजपला उत्तर प्रदेशमध्ये पराभव पत्करावा लागला तर काय होऊ शकतं? ही शक्यताही आपल्याला तपासून पाहावी लागेल. इतर राज्यांप्रमाणे एनडीएचे एकूण संख्याबळ हे अर्धे झाले तरी एनडीएकडे ४५.८ टक्के मतांचा वाटा असेल. अर्थातच १.८ टक्के आघाडी असेल, असेही तिवारी यांनी आकडेवारीतून स्पष्ट केले.

भाजपला जर उत्तर प्रदेशात १२० जागा मिळाल्या, २०१७ च्या संख्याबळाचा विचार केल्यास २०० पेक्षा अधिक जागा कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इलेक्टोरल कॉलेजमध्ये एनडीए आणि यूपीएकडे प्रत्येकी ४४.८ टक्के मतांचा वाटा असेल. अशावेळी स्वतंत्र पक्षांनी एनडीएला साथ दिली तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजप विजयी होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील पराभव हा विरोधकांच्या पथ्थ्यावर पडणार हे नक्की. त्यामुळे उत्तर प्रदेशची ही निवडणूक भाजपसाठी नक्कीच महत्वाची आहे, असंही मत तिवारी यांनी व्यक्त केलं.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani