लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

मी काही मागत नाही, तेवढं बेळगाव देऊन टाका, शरद पवार यांची मिश्किल टिप्पणी

लोकवार्ता : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून धगधगता आहे. बेळगाव, कारवार, निपाणी आदी मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडला जावा ही महाराष्ट्राची जुनीच मागणी आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. अधूनमधून सीमावादाचा प्रश्न पेटत असतो. या मुद्द्यावरून दोन्ही राज्यातील नेते त्यावरून आमनेसाने उभे ठाकतानाही दिसतात. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक मिश्किल विधान केलं आहे. पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी मिश्किल विधान केलं आणि एकच खसखस पिकली.

शरद पवार

पिंपरीत शरद पवार यांच्या हस्ते एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभाकर कोरे हे या रुग्णालयाचे संस्थापक आहेत. ते कर्नाटकात राहतात. ते शरद पवार यांचे घनिष्ट मित्रही आहेत. शरद पवार यांनी कोरे यांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केलेले आहे. कालही त्यांनी कोरे यांच्या या नव्या खासगी रुग्णालयाचं उद्घाटन केलं. त्यावेळी शरद पवार यांनी हे मिश्किल विधान केलं.

कोरे यांनी काही नवीन काढलं मला उद्घाटनला जावं लागतं. मग ते कर्नाटकात असो की महाराष्ट्रात असो. ही अनेक वर्षाची परंपरा आहे. नेहमीच त्यांना सांगतो, तुमची इतकी उद्घाटनं मी केली. मी काही मागत नाही. तो बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवून टाका, असं मिश्किल विधान शरद पवार यांनी केलं. तेव्हा सभागृहात एकच खसखस पिकली.

वैद्यकीय क्षेत्रात उत्तम काम
ते नेहमी सांगतात अख्खा कर्नाटक तुम्ही घ्या. पण बेळगावची मागणी करू नका. यातील चेष्टेचा भाग सोडून द्या. आज बेळगावच्या भागातील जनतेच्या हिताची जपणूक कोरे यांची संस्था करत आहे. वैद्यकीय क्षेत्रात ज्या काम करणाऱ्या उत्तम संस्था आहेत त्यात कोरे यांची संस्था आहे. ही संस्था बेळगावमध्ये चांगलं काम करत आहे. त्याचा परिणाम म्हणजे बेळगावमधील सर्व घटकांचा यांच्या संस्थेवर विश्वास आहे, असं शरद पवार म्हणाले.

कार्यक्षमता वाढवली
महाराष्ट्रात अशा संस्था आहेत. मी देखील रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे जिथे चार लाख विद्यार्थी शिकतात. राज्यात रयतचे काम जसे आहे नेमक्या त्याच पद्धतीचे काम केएलईचे कर्नाटकमध्ये आहे. मला आनंद आहे की त्यांनी त्यांची कार्यक्षमता कर्नाटकमधून महाराष्ट्रातही वाढवली, असं पवार म्हणाले.

लागेल ते सहकार्य करू
त्यांची सोलापूर येथे शाखा आहे. आज भोसरी इथे शाखा सुरु होत आहे. तसेच अजून काही ठिकाणी शाखा काढण्याचा त्यांचा विचार आहे. ते हॉस्पिटलपुरते थांबलेले नाहीत तर महाविद्यालय आणि हॉस्पिटल काढेपर्यंत ते शांत बसणार नाहीत. यासाठी त्यांना लागेल ते सहकार्य करण्याचा शब्द मी त्यांना दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ही संस्था अतिशय उत्तमरीत्या चालत आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, सावंतवाडी व कोल्हापूरमधील काही परिसरातील लोक वैद्यकीय सुविधेसाठी बेळगावच्या यांच्या हॉस्पिटलमध्ये जातात. वैद्यकीय क्षेत्र जरी माझे क्षेत्र नसले तरी या ना त्या कारणाने लोकांना मदत करावी लागते, असं त्यांनी सांगितलं.

मी थोडा जुन्या विचाराचा
माझ्या मते अलीकडे आधुनिकतेच्या माध्यमातून साधने खूप झाली, सुधारणा झाली आणि मोठमोठी हॉस्पिटल्स ठिकठिकाणी उभी राहिली. मी याबाबत थोडा जुन्या विचाराचा माणूस आहे.

माझ्या मते उत्तम हॉस्पिटल ही चांगली गोष्ट आहे. मात्र यासोबतच माझा कुटुंबाच्या डॉक्टरवर विश्वास जास्त असतो. त्यामुळे पेशंटचा विश्वास संपादन करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ते कौटुंबिक सेवा देणारे डॉक्टर करू शकतात, असं त्यांनी सांगितलं.

उत्तम वैद्यकीय सुविधा मिळेल
कोरे यांनी स्थापन केलेल्या वैद्यकीय किंवा शैक्षणिक संस्थांना मी अनेकदा भेट दिली आहे. त्यांचे वैशिष्ट्य आहे की अतिशय उत्तमप्रकारचे डॉक्टर तिथे आहेत. यातून साहजिकच ही संस्था दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांचे शेती महाविद्यालय, कृषी संशोधन केंद्र आणि अनेक संस्था आज उत्तम कामगिरी करत आहेत.

या संस्थेत आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या मदतीने हे उत्तम हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. माझी खात्री आहे की पिंपरी-चिंचवड परिसराला संस्थेकडून उत्तम वैद्यकीय सेवा दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संस्थेच्या मागे उभं राहणार
कोरे साहेबांनी हाती घेतलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील कामांमुळे त्यांचे नेहमीच स्वागत होत राहील. महाराष्ट्रात ही संस्था चालवत असताना तुम्हाला काही समस्या आल्यास त्या सोडवण्यासाठी मदत लागेल तेव्हा राज्यातील सर्व सहकारी तुमच्या संस्थेमागे उभे राहतील, हा विश्वास देतो, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani