मी कामगाराचा मुलगा, एसटी कामगारांसाठी लढणार- आमदार महेश लांडगे
-आझाद मैदान येथे सुरू असलेल्या एसटी कामगार आंदोलनाला दिला पाठिंबा
-सदाभाऊखोत, गोपिचंद पडळकर यांच्या सोबत राज्य सरकारविरोधात एल्गार
पिंपरी । लोकवार्ता-
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही. मी एका कामगाराचा मुलगा आहे. त्यामुळे एसटी कामगारांसाठी लढणार आहे, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र परिवहन महामंडळ (एसटी) चे शासनामध्ये विलनीकरण करावे. या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद सुरू केला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचारी आंदोलनासाठी बसले आहेत. विधान परिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करीत आहेत.
दरम्यान, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आझाद मैदानावर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनाला भेट दिली. तसेच, आंदोलनाला पाठिंबा असून, मागणी मान्य होईपर्यंत लढा देण्याचा निर्धार केला आहे.

राज्य सरकारला जाग कधी येणार : लांडगे
सातारा एसटी आगारातील चालक संतोष वसंत शिंदे हे गेल्या पाच दिवसांपासून संप सुरू असल्यामुळे तणावात होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात २ मुले, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता माणूस गेल्यामुळे शिंदे कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे. आतापर्यंत ३८ एसटी कामगारांनी आपले आयुष्य संपवले आणि आता आणखी किती संतोष प्राण गमावल्यानंतर राज्य सरकारला जाग येईल, असा सवाल आमदार महेश लांडगे यांनी उपस्थित केला आहे.
