शहरवासीयांनी साथ दिली तर दिल्लीसुद्धा गाजवणार – लक्ष्मण जगताप
गेल्या दोन दशकांपासून पिंपरी-चिंचवडकरांसाठी काम करीत आहे

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडकरांसाठी गेल्या दोन दशकांपासून काम करीत आहे. शहरवासीयांनी संधी दिली, तर दिल्लीसुद्धा गाजवण्याची तयारी आहे, असा विश्वास भाजपाचे दिग्गज नेते आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला आहे. ‘पुणे मिरर’ या इंग्रजी माध्यमातील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमदार जगताप यांनी आपल्या राजकीय वाटचालीबाबत भूमिका मांडली आहे.

अगदी छोट्या घटकाच्या विकासासाठी मी सामाजिक क्षेत्रात कार्यकरत आहे. हेच काम मला दिल्लीत करायला मिळाले, तर आनंदच आहे. आव्हानांचा सामना करण्यासाठी मी कायम तयार असतो. पिंपरी-चिंचवडकरांच्या समस्या आणि अडचणींचा आवाज दिल्लीतील संसदभवनात उठवाला आवडेल, पिंपरी-चिंचवडकरांनी संधी दिली, तर निश्चितपणाने दिल्लीत प्रतिनिधीत्व करणार आहे. असे लक्ष्मण जगताप यांनी म्हटले आहे.
जगताप यांनी यापूर्वीच मावळ लोकसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यावेळी शेकापने त्यांना पाठिंबाही दिला होता. मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि जगताप यांच्यात २०१४ मध्ये लढत झाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये मावळच्या रिंगणात राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांची ‘एन्ट्री’ झाली. त्यावेळी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जगताप यांनी बारणेंना ताकद दिली होती. आता स्वत: जगताप इच्छुक आहेत. २०२४ मध्ये मावळ लोकसभेचा तगडा उमेदवार म्हणून लक्ष्मण जगताप रिंगणात उतरणार आहेत. मावळमध्ये भाजपाचा मतदार मोठा आहे. त्याचा फायदा जगताप यांना होणार आहे. तसेच महाविकास आघाडीकडून श्रीरंग बारणे की पार्थ पवार या दोघांपैकी एकास संधी मिळणार आहे. भाजपाने जगताप यांना मावळातून लढवले, तर निश्चितपणे मावळ लोकसभेचे समीकरण बदलणार, असे चित्र दिसत आहे.
शेवटपर्यंत भाजपासोबत राहीन
मी भाजपामध्ये समाधानी आहे. शेवटपर्यंत पक्षासोबत राहीन. भाजपाची विचारधारा आम्ही स्वीकारली आहे. समाजाच्या विकासासाठी शक्य ते सर्व भाजपाच्या माध्यमातून करणार आहोत. ज्यावेळी मी भाजपासोबत आलो, त्यावेळी माझे समर्थक आणि नागरिकांनीही या निर्णयाला समर्थन दिले आहे, अशी ठाम भूमिका आमदार जगताप यांनी मांडली. त्यामुळे आगामी काळात जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करतील, अशा शक्यतांना तिलांजली मिळाली आहे.