पिंपरी-चिंचवडमध्ये ‘गाववाला आणि बाहेरवाला’ राजकारण यापुढे चालणार नाही – पार्थ पवारांचा इशारा
-सत्ताधारी भाजपने ‘लोकांचा अपमान व फूट’ पाडणं थांबवावं, पार्थ पवाराचं आवाहन
-भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना थेट इशारा
पिंपरी।लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड शहरात संपुर्ण महाराष्ट्रातील लोक स्थिरावले आहेत. त्या लोकांनी शहराच्या विकास कामात कररुपी योगदान दिलं आहे. मात्र, सत्ताधारी भाजपने लोकांचा अपमान करुन फूट पाडण्याचं कारस्थान पुन्हा सुरु केले आहे. यापुढे ‘गाववाला आणि बाहेरवाला’ राजकारण चालणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी दिला. दरम्यान भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना सूचक इशारा दिल्याचं बोलले जात आहे.
एकेकाळी पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. शहराचे कारभारी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: लक्ष घालून चेहरा-मोहरा बदलण्याचे काम केले. स्वच्छ व सुंदर आणि बेस्ट सिटी म्हणून पिंपरी-चिंचवड शहर देशात क्रमांक एकचे बनले होते. मात्र, आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी ‘नको भानामती, नको बारामती’चा नारा देत राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता उलथवून टाकली होती. त्यावेळी स्थानिक गाववाल्यांना केवळ बाहेरच्या लोकांनी मदत केली म्हणून हे शक्य झाले होते. हे त्यांनी विसरु नये, अशी चर्चा शहरात सुरु आहे.
शहरात महापालिका निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहे. त्यानूसार महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सर्व पक्ष ताकदीने उतरु लागले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार हे देखील शहरातील प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत. सत्ताधारी भाजप विरोधात राष्ट्रवादी देखील दंड थोपटून मैदानात उतरले आहे. शहर भाजप कारभा-यांच्या विरोधात पार्थ पवारांनी मैदानात उडी घेवून जशास तसे उत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे.
भाजपच्या सत्तेला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते सक्रिय झाले असून, पार्थ पवार देखील विरोधकांना तोडीतोड देत आहेत. नूकतेच पार्थ पवार यांनी केलेले एक ट्विट चर्चेत आले आहे. “पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोक स्थिरावलेत. विकासात कररूपाने सर्वांनीच समान वाटा दिलाय. त्यामुळे शहरी व बाहेरचा वाद उभा करून सत्ताधाऱ्यांनी लोकांचा अपमान आणि फूट पाडणे थांबवावे. गाववाला व बाहेरचा हे राजकारण आता चालत नाही. आगामी निवडणुकीत लोक याला थारा देणार नाहीत” असं मत त्यांनी व्यक्त करत एक प्रकारे भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना इशारा दिला आहे.