येत्या महापालिका निवडणुकीमध्ये मित्रपक्ष सोबत आले तर ठीक, नाहीतर स्वबळावर काम करू -सचिन अहिर
पिंपरी । लोकवार्ता-
महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही आहे त्यामुळे आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड आमच्या मित्रपक्षाला पूर्णपणे सोडून दिला नाही, असा सूचक इशारा शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. सचिन अहिर यांनी अडीच वर्ष्यापुर्वी राष्ट्रवादी सोडून शिवसेने मध्ये प्रवेश केला होता. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणूक जिंकून देण्यात अहिर यांचा मोलाचा वाटा मानला जातो.

आगामी महापालिका निवडणुकीत मित्रपक्ष सोबत आले तर ठीक, नाही आले, तर आम्ही स्वबळावर आणि पक्ष संघटनेच्या जीवावर काम करु, असं मत सचिन अहिर यांनी व्यक्त केलं. पिंपरी-चिंचवड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अहिर बोलत होते. “शंभर टक्के लढू किंवा 70-80 टक्के लढू, आज काही भाकित करणं उचित ठरणार नाही, कारण प्रभागाच्या रचना कशा होत आहेत, कसे उमेदवार आहेत, कारण काही काम करणारे उमेदवार आमच्या डोळ्यासमोर आहेत, पण तिथे आरक्षण पडलं, तर काय याचा विचार करावा लागेल” असंही सचिन अहिर म्हणाले.
“सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या बाबत दिलेला निर्णय धक्कादायक म्हणावा लागेल, कारण तो स्थगित करुन नवीन निवडणूक घ्यायला सांगितलं आहे, असं होत नाही काही वेळा. नगरपालिकेच्या निवडणुका वेळेवर होतील, की त्याही स्थगित होतील, हाही प्रश्न आमच्यासमोर आहे” असं सचिन अहिर यांनी सांगितलं.
शरद पवार माझ्या ह्रदयात आहेत, तर उद्धव आणि आदित्य माझ्या शरीरात राहतील. आपण राष्ट्रवादी फोडण्याचं काम करणार नाही, पण शिवसेना वाढवण्याचं काम नक्की करु, असं सूचक वक्तव्य जुलै 2019 मध्ये शिवसेनाप्रवेशावेळी सचिन अहिर यांनी केलं होतं.