लेडी सेहवागचा पदार्पणाच्या कसोटीत धावांचा पाऊस!
पहिल्या डावात शफालीने शतक अवघ्या चार धावांनी हुकले होते

लोकवार्ता । प्रतिनिधी
‘लेडी सेहवाग’ म्हणून ओळखली जाणारी भारताची स्फोटक सलामीवीर महिला फलंदाज शफाली वर्माने तिच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावून इतिहास रचला आहे. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात ५० हून अधिक धावांची खेळी करणारी १७ वर्षीय शफाली सर्वात युवा फलंदाज ठरली आहे.

अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली भारतीय आणि चौथी महिला फलंदाज आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी तिने ही कामगिरी केली. शफालीने पहिल्या डावात ९६ धावांची खेळी केली होती, तर तिसर्या दिवशी खेळ संपेपर्यंत ती ५५ धावांवर नाबाद राहिली होती.
शफालीने या कसोटी सामन्यात आतापर्यंत १५१ धावा केल्या आहेत. पदार्पणाच्या कसोटीत दीडशेहून अधिक धावा करणारा शफाली ही भारताची चौथी फलंदाज आहे. पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. धवनने २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८७ धावा केल्या होत्या. यानंतर रोहितने २०१३ मध्येच वेस्ट इंडिजविरुद्ध १७७ धावा केल्या होत्या. लाला अमरनाथ यात तिसऱ्या क्रमांकावर आहेत, १९३३मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध १६६ धावा केल्या. पदार्पणाच्या कसोटीत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शफाली करू शकते आणि त्यासाठी तिला ३७ धावांची गरज आहे.
पहिल्या डावात शफालीने शतक अवघ्या चार धावांनी हुकले होते. महिला क्रिकेटच्या इतिहासात शतक ठोकणारी सर्वात युवा फलंदाज होण्याचा विक्रम तिला खुणावतो आहे. या डावात ती शतक झळकावू शकते. शफाली आता १७ वर्षे १४२ दिवसांची आहे आणि जर तिने शतक ठोकले, तर सचिन तेंडुलकरनंतर ती सर्वात कमी वयातील शतक ठोकणारी भारतीय खेळाडू असेल. १७ वर्ष १०७ दिवस असे वय असताना १९९०मध्ये सचिनने इंग्लंडविरुद्ध मॅनचेस्टर कसोटीत ११९ धावांची खेळी केली होती.