अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात रोजगार शिक्षणाचा समावेश करा
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी शिक्षणाला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे. या विभागाचा अभ्यासक्रम दर्जेदार नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे, असे शिक्षण तंज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांत रोजगार शिक्षणाचा समावेश करता येईल का? याबाबत सकारात्मक राज्य सरकारने करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, अभियांत्रिकीचे प्रशिक्षण ज्या पद्धतीने दिले जाते, त्यात आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. त्याशिवाय अभियंत्यांना केवळ शिक्षणास अनुकूल वातावरण निर्माण करणे अपेक्षीत आहे. रोजगारक्षम शिक्षण निर्माण केल्यास विद्यार्थी संख्या पुर्वीसारखी वाढेल.
एआयसीटीईच्या आकडेवारीनुसार गेल्या १० वर्षांतील विद्यार्थी संख्या ही अत्यंत कमी आहे. यंदा ६३ शैक्षणिक संस्था बंद करण्यासाठी मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे यंदा २ हजार ८९२ अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांमध्ये १२ लाख ५१ हजार ७७३ ही सगळ्यात कमी प्रवेशक्षमता असणार आहे. त्यामुळे अभियंता होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होऊ लागला असल्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. गुणवत्तेकडे लक्ष न देता अभियांत्रिकी महाविद्यालये उभी राहिली आणि अभ्यासक्रमाचा दर्जा घसरत गेला. आगामी काळात शिक्षण संस्थाचालक आणि सरकारने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा कसा राखला जाईल याकडे लक्ष द्यायला हवे, तसेचं जागतिक दर्जाशी सुसंगत असणारा अभ्यासक्रम तयार करावा लागणार आहे.
तसेच, अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शिष्यवृत्ती, सबसीडी, फी माफी अशा योजना राबवण्याची आवश्यकता आहे. नुकतेच राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करण्यात आला. औद्योगिक प्रगतीचा अभियंता हा कणा आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. यासह अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेता येईल का? याबाबत सकारात्मक विचार होण्याची गरज आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.