पाणीटाक्यांच्या परिचालनासाठी ९६ लाख रूपये इतका वाढीव खर्च
पाण्याच्या टाकींचे परिचालन करणे आणि किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी शुभम उद्योग या ठेकेदाराला कामाचे आदेश

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी : महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवरील वितरण व्यवस्थेसाठी ठेकेदारी पद्धतीने मजुर पुरविण्यात येतात. इ क्षेत्रीय कार्यालय हद्दीअंतर्गत भोसरी पपिंग, भोसरी गावठाण टाकी, शांतीनगर, आश्रमशाळा आणि संत तुकारामनगर येथील जलक्षेत्रामध्ये दैनंदीन व्हॉल्व ऑपरेशन करण्यासाठी तसेच किरकोळ दुरूस्ती करण्यासाठी अकुशल कामगारांची आवश्यकता असते.

पाण्याच्या टाकींचे परिचालन करणे आणि किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी ठेकेदारी पद्धतीने मजुर पुरविणाऱ्या दोन संस्थांवर दोन वेगवेगळ्या कामांसाठी सुधारीत अंदाजपत्रकाप्रमाणे २ कोटी ३८ लाख रूपये इतका खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये ९६ लाख रूपये इतका वाढीव खर्च होणार असून स्थायी समितीच्या सभेत या वाढीव खर्चास विनाचर्चा मान्यता देण्यात आली.
या कामासाठी सन २०१९-२० मध्ये उपलब्ध तरतुदीनुसार, आणि अंदाजपत्रकीय रकमेनुसार, पाण्याच्या टाकींचे परिचालन करणे आणि किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी १५ जून २०१९ रोजीच्या महापालिका सभेतील ठरावानुसार १ कोटी २० लाखाचे अंदापत्रक तयार करण्यात आले.
त्यास १ कोटी २१ हजार रूपयांची तांत्रिक मान्यता घेण्यात आली. त्यानुसार, सागर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला २९ जून २०२० रोजी कामाचे आदेश देण्यात आले. तसेच दिघी आणि बोपखेल येथील पाण्याच्या टाकींचे परिचालन करणे आणि किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी शुभम उद्योग या ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले.
भोसरी पंपिंग, भोसरी गावठाण टाकी, शांतीनगर, आश्रमशाळा आणि संत तुकारामनगर येथील कामाचा निविदा दर २४.२१ टक्क्यांनी कमी आहे. या कामाची मुदत १२ महिने म्हणजेच २८ जून २०२१ पर्यंत आहे. तर, दिघी आणि बोपखेल येथील कामाचा निविदा दर २९.२९ टक्क्यांनी कमी आहे. कामाची मुदत १० महिने म्हणजेच २८ एप्रिल २०२१ पर्यंत आहे.
दोन्ही ठेकेदारांनी ३१ मार्च पर्यंत काम निविदा रकमेइतके पूर्ण केले आहे. सन २०२१-२२ च्या मुळ अंदाजपत्रकात या दोन्ही कामासाठी ४८ लाखाची वाढीव तरतुद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार, परिचालन करणे किंवा मजूर पुरविण्याबाबतचे नवीन अंदाजपत्रक तयार करायचे झाल्यास त्या कामाचे आदेश मिळेपर्यंत सप्टेंबरपर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
तसेच सध्या कोरोना साथीच्या संकटामुळे निविदा कार्यवाहीस विलंब होण्याची शक्यता आहे. या कार्मासाठी वाढीव तरतुद ४८ लाख रूपये आणि सुधारीत अंदापत्रकीय १ कोटी ४० लाख रूपयांच्या मर्यादेत कामास सुधारीत मान्यता घेऊन काम सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक ठरणार आहे.
दोन्ही ठेकेदारांनी हे काम चालू निविदा दराने करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हे अंदाजपत्रक सुधारीत केल्यास महापालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. त्यानुसार, सुधारीत अदाजपत्रकाप्रमाणे या दोन्ही कामासाठी २ कोटी ३८ लाख १८ हजार रूपये इतका खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये ९६ लाख रूपये इतका वाढीव खर्च होणार आहे.