जगातील सर्वाधिक श्रीमंत खेडे भारतातच !
विदेशी कनेक्शन, गावाशी नाळ !

लोकवार्ता । प्रतिनिधी
जगातील अनेक आश्चर्यजनक गोष्टी भारतात असल्याचे दिसते. त्यात आता आणखी एका गावाची भर पडली आहे. हे गाव चक्क जगातील सर्वात श्रीमंत आहे. या एकाच गावातील लोकांच्या ५ हजार कोटी रुपयांच्या ठेवी बँकांमध्ये आहेत… झालात ना आवाक्…. होय हे खरे आहे.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मधापार हे ते गाव आता. जगातील सर्वाधिक श्रीमंत खेडे म्हणून समोर येत आहे. येथे ७,६०० घरे आहेत. या गावातील लोकांच्या ५ हजार कोटी रुपयांच्या ठेवी बँकांत आहेत. मधापारमध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल १७ बैंका आहेत.
कोण आहेत ही लोक ?
गावाचे वैशिष्ट्य असे की, गावात बहुतांश पटेल समुदायाच्या लोकांची वस्ती आहे. गावातील ६५ टक्के लोक एनआरआय आहेत, अमेरिका, ब्रिटन, आफ्रिका आणि आखाती देशात ते राहतात. तेथून प्रचंड पैसा आपल्या गावी पाठवतात. पुरेसा पैसा हाती आल्यानंतर अनेक जण नंतर भारतात परतून आपला उद्योग व्यवसाय उभारतात. कच्छच्या मिस्त्री समुदायाने वसविलेल्या १८ गावापैकी एक असलेल्या मापारी दरडोई बैंक ठेवींचे प्रमाण सरासरी १५ लाख रुपये आहे. गावात शाळा, महाविद्यालये, सरोवरे, हिरवळी, धरणे, आरोग्य केंद्रे आणि मंदिरे अशा सर्व सोयी सुविधा आहेत. एक अद्ययावत गोशाळाही आहे.
या लोकांनी १९६८ मध्ये लंडनमध्ये मधापार व्हिलेज असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली होती. अशीच एक संघटना गावातही कार्यरत आहे. दोन्ही संघटना समन्वय ठेवून काम करतात. गावातील अनेक जण विदेशात स्थायिक झाले असले, तरी त्यांनी आपली गावासोबतची नाळ कायम ठेवली आहे.