भारत-पाकिस्तान महामुकाबला
दुबई मध्ये आज खेळला जाणार सर्वात मोठा भारत -पाक मुकाबला.
दुबई |लोकवार्ता –
भारतीय संघाच्या टी-२० वर्ल्डकपमधील मोहिमेला फक्त काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारताची पहिली लढत कट्टर आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग सहावा विजय मिळून षटकार मारण्याच्या इराद्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरले. विराट सोबत यावेळी मैदानात उपकर्णधार रोहित शर्मा आणि मैदाना बाहेर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी देखील असेल. धोनीमुळे भारताची रणनिती आणखी मजबूत होणार आहे.

आयसीसीच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताचे पाकिस्तानविरुद्धचे रेकॉर्ड बिनतोड आहे. दोन्ही देशात वनडे आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या एकाही लढतीत भारताचा पराभव झालेला नाही. या दोन्ही संघात १९९२ साली सर्वप्रथम वर्ल्डकपमध्ये लढत झाली होती. त्या वर्षी भलेही पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकला असला तरी भारताविरुद्ध त्यांना विजय मिळवता आला नव्हता. २००७ पासून सुरू झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये देखील भारताने आतापर्यंत झालेल्या पाचही लढतीत विजय मिळवला आहे. दोन्ही देशात द्विपक्षीय क्रिकेट होत नसल्याने चाहत्यांना आयसीसीच्या स्पर्धांची वाट पाहावी लागते. या सामन्याचा प्रेक्षक फक्त भारत आणि पाकिस्तानमध्ये नाही तर जगभरात असतो. यामुळेच प्रसारकांची देखील मागणी या दोन्ही देशांच्या लढती अधिक व्हाव्यात अशीच असते. आयसीसीने देखील या वर्षी या दोन्ही संघांना एकाच गटात टाकले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकपेक्षा जास्त लढती होण्याची शक्यता आहे.