देशभरात होणार ‘इंडियन स्वच्छता लिग’; पिंपरी-चिंचवड शहर संघाचे महापालिकेने ‘पीसीएमसी पायोनियर’ नामकरण – आयुक्त शेखर सिंह यांची घोषणा
लोकवार्ता : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शनिवारपासून (दि. १७) राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपर्यंत (दि. २ ऑक्टोबर) देशभरात ‘इंडियन स्वच्छता लिग’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर संघाचे महापालिकेने ‘पीसीएमसी पायोनियर’ नामकरण केले आहे. त्याअंतर्गत शनिवारी शहरातील नऊ ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

‘इंडियन स्वच्छता लीग उपक्रमांतर्गत शनिवारी सकाळी आठ ते ११ या वेळेत शहरातील नऊ ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. विशेषतः शहरातील तलाव व पाण्याचे स्रोत, ऐतिहासिक स्थळे, टेकड्या, मोठे रस्ते व महत्त्वाच्या चौकात अभियान राबविण्यात येणार आहे. त्यात सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. सर्वाधिक नोंदणी असलेल्या देशातील अठराशे शहरांतून दहा शहरांची निवड करून त्यांचा केंद्र सरकारतर्फे सन्मान केला जाणार आहे. सद्यःस्थितीत देशात शहर सहाव्या क्रमांकावर आहे. त्याला आणखी वरच्या क्रमांकावर आणण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन सिंह यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या स्वच्छता लिगसाठी अभिनेता सयाजी शिंदे यांची निवड केली आहे. ते स्वतः शनिवारी मोहिमेत सहभागी होणार आहेत.
लोक म्हणायचे या आमदाराला कोणीच हरवू शकत नाही?
वेताळ महाराज घाट जुनी सांगवी, दुर्गादेवी टेकडी निगडी, मोरया गोसावी घाट चिंचवड, पिंपळे गुरव स्मशानभूमी नदी घाट, केजुदेवी बंधारा थेरगाव, त्रिवेणीनगर चौक ते भक्ती-शक्ती चौक निगडी, भारत माता चौक ते इंद्रायणी नदी पूल मोशी, सहल केंद्र भोसरी, अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते सद्गुरूनगर पीएमपी आगार या नऊ ठिकाणी शनिवारी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.