इंद्रायणीचे पात्र स्वच्छ, मात्र घाट अस्वच्छ; घाट परिसराची स्वच्छता करण्याची मागणी…
इंद्रायणी पात्रातील पाणी अतिशय स्वच्छ असल्याने इंद्रायणीने मोकळा श्वास घेतला

लोकवार्ता । प्रतिनिधी
मोशी : महापालिकेच्या वतीने इंद्रायणी पात्रातील जलपर्णी काढण्यात आल्याने पात्र स्वच्छ झाले आहे. मात्र, याच पात्रातील काही जलपर्णी व गाळ अद्यापही इंद्रायणी घाटाच्या पायऱ्यांवर पडून आहे. त्यामुळे या घाटावर अस्वच्छता पसरली आहे. या घाटासह संपूर्ण घाट परिसराची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या वतीने ठेकेदारांच्या माध्यमातून तळवडे ते डुडुळगाव यादरम्यान वाहणाऱ्या इंद्रायणी पात्रात मोठ्या प्रमाणावर वाढलेली जलपर्णी काढण्यात आलेली आहे. नुकत्याच दोन-तीन पावसामुळे इंद्रायणी पात्रातील पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती.
सध्या इंद्रायणी पात्रातील पाणी अतिशय स्वच्छ असल्याने इंद्रायणीने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र याच इंद्रायणीमधून काढलेली जलपर्णी व पाण्याबरोबर वाहत आलेला चिकट गाळही या पायऱ्यांवर पडून आहे तसेच नुकतेच या घाटाचे नूतनीकरण नाही करण्यात आले असून, अतिशय सुंदर पद्धतीने बांधण्यात आलेल्या या घाटाला या पडून असलेला गाळ व जलपर्णीमुळे या सुंदर अशा घाटाच्या सौंदर्यास गालबोट लागत आहे.
घाटाच्या लोखंडी प्रवेशद्वाराजवळही काही नागरिकांनी आपल्या घरांतील देवादिकांचे जुने फोटो, मूर्ती धार्मिक पुस्तके आदी साहित्य आणून ठेवल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी उपस्थित असलेल्या श्याम कराळे, मंगेश पवार, अस्मिता थिगळे, बबन अहिवळे, संतोष कर्डिले आदी नागरिकांनी या घाटाच्या पायांसह संपूर्ण घाट परिसराची स्वच्छता करण्याबरोबरच या ठिकाणी एखादा सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली आहे.
निसरड्या पायऱ्या
सध्या अन्य कारणांसह कोरोनामुळे निधन पावलेल्या नागरिकांचे दशक्रिया विधी दररोज याच घाटावर होत आहेत. दशक्रिया विधीच्या निमित्ताने नागरिक येथे विविध धार्मिक कार्यक्रम करतात. हात-पाय धुण्यासाठी नदीपात्रात उतरण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या घाटावरील पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर चिकट गाळ व जलपर्णी साठली असल्याने निसरड्या पायऱ्यांवरून नदीपात्रात उतरता येत नाही.