BCCI साठी IPL महत्त्वाचं होतं, त्यामुळं…
नक्कीच, प्रेक्षकांना त्यांचे पैसे परत मिळतील

लोकवार्ता । प्रतिनिधी
भारतीय खेळाडूंनी मँचेस्टरमध्ये कसोटी खेळण्यास नकार दिल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठा निर्णय घेतला. नाणेफेक होण्याच्या काही वेळापूर्वी, पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना रद्द करण्यात आला. भारतीय शिबिरात करोनाने एन्ट्री घेतल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला, परंतु इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने यापाठी एक वेगळे कारण दिले आहे. इंग्लंडच्या माजी कर्णधाराच्या मते, बीसीसीआयसाठी आयपीएल महत्त्वाचे होते त्यामुळे व्यस्त वेळापत्रक हे मँचेस्टर कसोटी सामना रद्द होण्याचे एक कारण होते. पाच सामन्याच्या या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ असा आघाडीवर होता.
डेली मेलच्या स्तंभात हुसेनने लिहिले, “नक्कीच, प्रेक्षकांना त्यांचे पैसे परत मिळतील, पण त्यांना कोणताही सामना बघायला मिळणार नाही. प्रवास आणि निवासाची परतफेड केली जाणार नाही. ते एका चांगल्या सामन्याला मुकले.”
हुसेन पुढे म्हणाला, “आपण सध्या क्रिकेट विश्वात आहोत, कारण तेथे व्यस्त वेळापत्रक आहे आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) देखील पुढे आहे. करोनाचे प्रकरण भारतीय शिबिरात येताच, काही निर्णय त्या स्पर्धेबाबतही होते. हे लक्षात ठेवले पाहिजे की भारत या कसोटी सामन्यातील परिस्थितीबद्दल नेहमीच सावध होता.”
नासिर हुसेनच्या मते, बीसीसीआयसाठी आयपीएल आवश्यक आहे. पाचव्या कसोटीच्या स्थितीबद्दल बोर्ड फार आनंदी नव्हता. हुसेन म्हणाला, “तुम्हाला आठवत असेल, की त्यांनी ते दुसरीकडे घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी आयपीएल महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादा संघ अशा प्रकारे सामन्यातून बाहेर पडतो, तेव्हा कसोटी सामन्याचे तिकीट काढणाऱ्यांसाठी ही एक अपरिहार्य परंतु दुःखदायक गोष्ट आहे.”