लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

बहिणींवर कारवाई केल्याचं वाईट वाटतं

इतक्या खालच्या पातळीला जाऊन राजकारण…

lokvarta

लोकवार्ता । प्रतिनिधी

माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याचं काही वाटत नाही. पण फक्त रक्ताचं नातं आहे म्हणून राजकारणाशी, कंपन्यांशी दुरान्वये संबंध नसलेल्या माझ्या बहिणींवर कारवाई केली जाते याचं वाईट वाटतं अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी जाहीर केली आहे. अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे. दरम्यान या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून नाराजी आणि संताप जाहीर केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

छापेमारी कोणावर करावी हा प्राप्तिकर विभागाचा अधिकार
“छापेमारी कोणावर करावी हा प्राप्तिकर विभागाचा अधिकार आहे. जर काही शंका आली तर ते छापेमारी करु शकतात. त्याप्रकारे माझ्याशी संबंधित काही कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. आम्ही दरवर्षी कर भरणारे आहोत. मी राज्याचा अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची असते, कोणताही कर कसा चुकवायचा नाही हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे माझ्याशी संबंधित कंपन्यांचे कर वेळीच भरले जातात,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

बहिणींवर कारवाई केल्याचं वाईट वाटतं
“राजकीय हेतूने ही धाड टाकली की आणखी काय माहिती हवी होती हे प्राप्तिकर विभागच सांगू शकेल. माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांवर धाड टाकली याबाबत मला काही म्हणायचं नाही, कारण मी पण एक नागरिक आहे. फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं की माझी कोल्हापूरची एक आणि पुण्यातील दोन अशा तीन बहिणी ज्यांची ३५, ४० वर्षापूर्वी लग्नं झाली आणि संसार सुरु आहे त्यांच्यावरही कारवाई सुरु आहे. आता यामागचं कारण मात्र मला समजू शकलं नाही. कारण त्या व्यवस्थितपणे आपलं आयुष्य जगत आहेत. त्यांच्या मुलांची, मुलींची लग्न झाली असून नातवंडंदेखील आहेत. असं असताना त्यांचा तसं पाहिलं तर अजित पवारचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने कोणत्या स्तराला जाऊन वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जात आहेया गोष्टीचा नक्की विचार केला पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.

इतक्या खालच्या पातळीला जाऊन राजकारण…
“इतर संस्था, कंपन्यांवर कारवाई केली याबाबत मला काही म्हणायचं नाही. त्यांना जे हवं ते करु शकतात. पण ज्यांचा संबंध नाही त्यांच्याबद्दल मात्र वाईट वाटतं. इतक्या खालच्या पातळीला जाऊन कोणी राजकारण करु शकतं हे मला आजपर्यंत कळलेलं नाही,” अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

“अनेक सरकारं येत असतात, जात असतात..पण जनताच सर्वस्व असते. गेल्यावेळी निवडणुकीच्या काळात शरद पवारांचा एका बँकेशी काही काडीचा संबंध नसताना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यातून बरंच काही रामायण किंवा राजकारण घडलं म्हणा,” याची आठवण करुन देताना अजित पवारांनी प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या हे वृत्त खरं असल्याचं सांगितलं.

“आपण अनेक सरकारं बघितली तर प्रत्येकाची कामाची पद्दत जनतेसमोर आहे. आता मात्र कशा पद्धतीने सुरु आहे हे दिसत आहे. मीडियावर दबाव आहे का अशीही शंका येते. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याचं काही वाटत नाही. पण फक्त रक्ताचं नातं आहे म्हणून राजकारणाशी, कंपन्यांशी दुरान्वये संबंध नसलेल्या माझ्या बहिणींवर कारवाई केली जाते,” असा संताप अजित पवारांनी व्यक्त केला. केंद्रात सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या कोणत्या नेत्यावर, त्यांच्या कारखान्यावर कारवाई झाली का? अशी विचारणा यावेळी अजित पवारांनी केली.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani