“शर्यतीचे नियम माहीत नसने म्हणजे विरोधकांचे दुर्दैवच”
-गाडामालकांच्या आनंदात सहभागी व्हा, राजकारण करण्याची गरज काय ?
पिंपरी |लोकवार्ता-
भोसरीसह राज्यातील बैलगाडा प्रेमींच्या अस्मितेचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. कोर्टात बैलगाडा मालकांची बाजू मांडण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चांगले वकिल दिले. या निकालाने बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला असून यापुढे महाविकास आघाडी सरकारने तयार करून दिलेल्या नियमांनुसार बैलगाडा शर्यती भरविण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या प्रयत्नाला आलेल्या यशाचे श्रेय लाटण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून पातळी सोडून राजकारण केले जात आहे. ज्यांनी प्रयत्न केलेच नाहीत, ते आज छातीठोकपणे आमच्यामुळे यश आल्याचे सांगत सुटले आहेत. बैलगाडा मालक या भूलथापांना कदापी बळी पडणार नाहीत, असा विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी गुरुवारी (दि. 16) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. यापूर्वी मुंबई हायकोर्टाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. मात्र, आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे प्रणेते मा. श्री. शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांनी बैलगाडा मालक संघटनेच्या शिष्ठमंडळासोबत अनेकवेळा बैठका घेऊन चर्चा केली. जलसंपदा मंत्री मा. श्री. जयंत पाटील साहेब व पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा. श्री. सुनिल केदार यांनी देखील गाडामालक आणि सरकार यांच्यात समन्वय घडवून आणण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु, हाय कोर्टाने बंदी कायम ठेवल्यामुळे या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. कोर्टात बैलगाडा मालकांची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांनी चांगल्या वकिलांशी चर्चा करून त्यांच्याकडे हे प्रकरण सोपविले. वकिल मुकूल रोहतगी यांनी बैलगाडा शर्यतीची सत्य परिस्थिती आणि खेळाविषय असलेली अस्मिता भक्कम पुराव्यानिशी मांडली. ही बाजू सिध्द झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाने बैलगाडा मालकांच्या बाजुने निकाल दिला आहे, असेही माजी आमदार लांडे यांनी म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाने गाडा मालकांसाठी दिलासादायक निकाल दिला असला तरी शर्यती घेताना नियम घालून दिले आहे. त्या नियमांचे पालन करणे बैलगाडा मालकांना बंधनकारक राहणार आहे. यापुढे नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेवूनच शर्यती घेणे योग्य ठरणार आहे. यापूर्वी बैलगाडा शर्यतीचे ब-याचजणांनी राजकारण केले. या विषयाचा मुद्दा करून आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. आता महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या यशाचे देखील श्रेय लाटण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून प्रयत्न सुरू आहे. हा विषय भोसरीसह राज्यातील तमाम गाडामालकांच्या अस्मितेचा आहे. विरोधकांनी किमान या विषयाचे तरी राजकारण करायला नको होते. या निकालानंतर गाडामालकांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, या विषयाचे राजकारण करणे योग्य नाही. जे श्रेय लाटतायत त्यांना बैलगाडा शर्यत भरविण्याची राज्य सरकारने तयार केलेली नियमावली देखील सांगता येत नाही, याहून मोठे दुर्दैव त्या पक्षाचे दुसरे कोणते नसेल. या निर्णयाचा आधार घेऊन आपली राजकीय पोळी भाजू पाहणा-या पक्षाच्या लोकांना गाडामालक योग्य वेळी धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास माजी आमदार लांडे यांनी व्यक्त केला आहे.
..म्हणून शर्यतींवर बंदी घालण्यात आली
शर्यतींमध्ये बैलांना चाबकाने, मोठ्या काठीने अमानुष मारणे, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणे, शेपूट चावणे, असे अनेक प्रकार करून अत्याचार केले जात असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे प्राणी मित्र संघटनेकडून बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने 2017 साली बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. ही बंदी आतापर्यंत कायम होती. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून मागणी करण्यात आली. भोसरीसह ग्रामीण भागात अनेकदा आंदोलने करण्यात आली. उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बंदी उठवण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला. अजितदादांच्या पाठपुराव्याने याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. शेवटी या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे राज्यातील बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातारवण आहे, असे माजी आमदार लांडे यांनी म्हटले आहे.