जगद्गुरू संत तुकारामांचे मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले
-उत्तर दरवाज्यातून मुखदर्शन घेता येणार.
पुणे । लोकवार्ता
देहू येथे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे.देहू संस्थानाने संत तुकाराम महाराजांचे मंदिर 14 जूनपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता तेच मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. केवळ पंतप्रधानांच्या कार्यक्रमादिवशी म्हणजे 14 जूनला सायंकाळी पाचपर्यंत मंदिरात भाविकांना बंदी असणार आहे. त्यामुळे सोमवारी भाविकांना मंदिराच्या उत्तर दरवाज्यातून दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती देहू संस्थानचे विश्वस्त नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.

देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर भाविकांसाठी तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर विश्वस्तांनी शनिवारी सांगितले होते. परंतु, या निर्णयानंतर समाजमाध्यमांवर आलेल्या प्रतिक्रिया आणि भाविकांची होणारी गैरसोय यामुळे हा निर्णय बदलण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी दुपारपर्यंत मंदिर स्वच्छता आणि सॅनिटायझेशनचे काम सुरू होते. मात्र, आता हे काम पूर्ण झाल्याने मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.मात्र, सुरक्षिततेच्या कारणस्तव भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात सोडण्यात येत नाही. मंदिराच्या उत्तर दरवाजातून त्यांना मुख दर्शन करता येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी देहूत येत असल्याने त्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मंदिर सर्व प्रकारे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पाच नंतर ते पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे, असे मोरे यांनी सांगितले.