शिवजयंतीपासून गर्जा महाराष्ट्र ! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब
लोकवार्ता : महाराष्ट्राला राज्यगीत मिळाले असून त्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून 2023 पासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मंत्रिमंडळात हा निर्णय मांडण्यात आला होता.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 15 निर्णय घेण्यात आले. यामध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक ठराविक गीत असावे, असे केंद्र सरकारने राज्यांना सुचवले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ याचे गीतकार राजा बढे आहेत. तर गायक शाहीर साबळे असून संगीतकार श्रीनिवास खळे आहेत. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले आहे.
आज कॅबिनेट मध्ये गर्जा महाराष्ट्र माझा यातील 2 कडव्याचं गीत हे राज्य गीताचा दर्जा देण्यात आले आहे. राष्ट्रगीतानंतर आता राज्यात हे राज्यगीत गाण्यात येईल. विधानभवनात सुद्धा वंदे मातरम नंतर गर्जा महाराष्ट्र गीत म्हणावं यासाठी विनंती आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात सुद्धा राज्यगीत म्हटलं जावं, असे सुधीर मनगंटीवार म्हणाले.