पिंपरी चिंचवडच्या पाणीटंचाईला अजित पवार जबाबदार; भाजपची टीका
प्रशासक राजेश पाटील यांना सोबत घेऊन पाणीटंचाई केली निर्माण.
पिंपरी । लोकवार्ता-
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाने केलेल्या विकासकामांचं भूमीपूजन आणि उद्घाटन करून उपमुख्यमंत्री अजित पवार आयते श्रेय लाटत आहेत. प्रशासक राजेश पाटील यांना हाताशी धरून अजित पवारांनीच शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली आहे. पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे राजकारण सुरू आहे, अशा शब्दांत भाजपाने अजित पवारांवर टीका केली आहे.

दररोज पाणीपुरवठा करण्यात अपयश आल्याचे सांगत त्यांनी भाजपा नेत्यांची खिल्ली उडवली, त्यास भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे प्रवक्ते एकनाथ पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने २४ तास पाणी देण्याचे आश्वासन देऊन पालिकेची सत्ता १५ वर्षे भोगली. मात्र, पाण्याचं आश्वासन पाळलं नाही. सद्यस्थितीत पालिकेचे प्रशासक राजेश पाटील यांच्या आडून शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असून याचा आरोप भाजपावर केला जात आहे. भाजपने ५ वर्षात आंद्राच पाणी उपलब्ध करून दिले आहे. तसे झाल्यास संपूर्ण शहराचा पाणी प्रश्न मिटणार आहे. निवडणुका येताच अजित पवारांना पिंपरी-चिंचवडचे प्रश्न दिसू लागले आहेत. त्यांनी नागरिकांना दररोज पाणी देण्याचं आश्वासन दिलं. मात्र, आधी पालिकेची सत्ता द्या, अशी लाच देखील दिली.गेल्या काही वर्षात भाजपने पिंपरी चिंचवड चा कायापालट केला आहे. महापालिकेची पंधरा वर्ष सत्ता असताना पवना धरणातून थेट बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी प्रश्न मार्गी लावता आला असता. त्यांनी तो प्रकल्पच गुंडाळून ठेवला, अशी टीकाही एकनाथ पवारांनी केली आहे.