लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

समाजमाध्यमांचा वापर करताना तारतम्य राखावे : अरुण बोऱ्हाडे

सामाजिक माध्यमे म्हणजेच व्हॉटसॲप, फेसबुक इत्यादी विचारपूर्वक वापरले तर खूप माहितीप्रद, ज्ञानवर्धक आणि प्रभावी साधने आहेत.

लोकवार्ता।प्रतिनिधी

व्हॉटसॲप आणि फेसबुक
सामाजिक माध्यमे म्हणजेच व्हॉटसॲप, फेसबुक इत्यादी विचारपूर्वक वापरले तर खूप माहितीप्रद, ज्ञानवर्धक आणि प्रभावी साधने आहेत. अर्थात खूप थोडेजण याचा त्याअर्थाने उपयोग करताना दिसतात. एरवी टाईमपास अथवा मनोरंजन म्हणूनच त्याकडे पाहिले जात आहे.

सामाजिक माध्यमांविषयी सुरुवातीपासूनच मी काही गोष्टी पाळल्या आहेत. उदा. वैयक्तिक पातळीवर अनेकांशी संपर्क असला तरी, व्हॉटसॲपच्या फार थोड्या समुहांना म्हणजेच ग्रुपला मी जोडलेलो आहे. मध्यंतरी ऊठसूठ कोणीही ग्रुप म्हणजे समूह काढायचे, कोणालाही सामावून घ्यायचे. किमान आपण ज्या समूहात आहोत, त्यातील कोण कुठले लोक आहेत, हे तरी कळावे ना!

ग्रुपवरती येणाऱ्या संदेशांपैकी (मेसेज) फारच थोडे वाचले जातात. त्यातील अनेक संदेश न वाचताच इकडून तिकडे फिरविलेले किंवा आहे तसेच पुढे पाठविलेले (फॉरवर्डेड) असतात. आश्चर्य वाटते, आमच्या लहानपणी अकरा पत्रे लिहून पाठवा, अमूक देवाची कृपा होईल, नाहीतर अवकृपा होईल. अशी पत्रे यायची. आज एकविसाव्या शतकात, माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही असेच संदेश पाठविले जात असतील तर, लिहिणारांची व पुढे प्रसारित करणारांची कीव करावीशी वाटते. त्यामुळेच ज्ञानवर्धक ठरण्याऐवजी बरेचदा आजही अंधश्रद्धेला खतपाणी घातले गेल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे एका समुहात अर्थात व्हॉटसॲप ग्रुपमध्ये असूनही अनेकांचा परिचय देखील होत नाही. तेवढ्या गांभीर्याने याकडे कोणी लक्षच देत नाहीत. कोणीतरी ठराविक राजकीय दृष्टिकोन ठेवून किंवा अंधश्रद्धेने लेखन करतो. बकरांच्या कळपाप्रमाणे अनेकजण न वाचताच पुढे पाठवित राहतात. सहज म्हणून फोन करून विचारणा केल्यावर समजते की यांनी न वाचताच त्याचा प्रसार केलेला असतो. म्हणून अशा समूहांत नसलेले चांगले.

व्हॉटसॲप समूह शक्यतो विशिष्ट क्षेत्रातील लोकांनी केलेले असावेत. एखादी हौसिंग सोसायटी, विविध संस्था आणि संघटना, काही आस्थापनातील कर्मचारी, नातेवाईक किंवा परिवार इत्यादी प्रकारचे समूह अनेक अर्थांनी उपयोगी पडतात. असे समूह विचारविनिमय करण्यासाठी किंवा आवश्यक संदेश पोहोचविण्यासाठी असे समूह सोयीचे पडतात. हल्ली काही पत्रकारांनी स्वतःचे ‘न्यूज पोर्टल’ सुरू केले आहेत. त्यांनी ही असे समूह तयार केलेत. एखादी बातमी काही वेळातच या सर्व समूहांत वाचायला मिळते.

अनेक समुहांवर कधीकधी मजकूर आणि चित्रांची एवढी गर्दी होते की नको वाटते. विविध सणांच्या शुभेच्छा, सकाळचे ‘गुड मॉर्निंग’ आणि रात्रीचे ‘गुड नाईट’ पाठविताना तीच ती भडक रंगाची फुले किंवा इतर चित्रे पाहताना नकोच वाटते. बरं हे सर्व पाहावे कधी ! कोणी बिचारा गेला असेल तर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ची अशी रांग लागते की खरोखरच यांना कोणी गेल्याचे दुःख झालेय !तेवढयात कोणीतरी दुसऱ्या कोणाच्या ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ लिहितो, की सर्व मोर्चा श्रद्धांजली सोडून शुभेच्छांकडे वळतो! अर्थात मानवी जीवनामध्ये या भावभावनांना निश्चितपणे अर्थ आहे. पण वापराचे व वेळेचे भान व अवधान असावे इतकेच.

कधीकधी समूहात कोणीतरी चांगले विचार मांडलेले असतात. कोणी काही आठवणी लिहिलेल्या असतात. काही विशेष सन्मान आणि कर्तबगारीची माहिती दिलेली असते. अशावेळी व्हॉटसॲपने दिलेल्या विविध स्माईलींचा अक्षरशः वर्षाव केला जातो. तिथेही आपण कोणत्या घटनेसाठी कोणता भाव असलेली स्माईली वापरावी, याचे भान काहीजण पाळत नाहीत. दुःखद घटना किंवा पुण्यतिथीलाही ‘सुंदर’ ‘छान’ अशा स्माईली देतात !

कधीकधी अतिशय महत्त्वाचे संदेश अथवा निमंत्रण या समुहाद्वारे पाठविले जातात. सकाळी कार्यालयात किंवा उद्योग व्यवसायात जाणारे अनेकजण दिवसभरात हे पाहत नाहीत. रात्री घरी आल्यावर हा समूहावरील संदेश गर्दीत हरवलेला असतो. चुकून वाचलाच तरी वेळ निघून गेलेली असते. म्हणून असे महत्त्वाचे संदेश शक्यतो वैयक्तिक खात्यावर पाठवावेत. यातही ‘ब्रॉडकास्ट ग्रुप’ हा एक चांगला पर्याय आहे. एकाचवेळी अडीचशे (२५६) जणांना हा संदेश पाठविता येतो. संबंधित व्यक्तीच्या वैयक्तिक खात्यावर तो जावून पडतो. मी स्वतः असे अनेक ‘ब्रॉडकॉस्ट ग्रुप’ केलेले आहेत. राजकीय, सामाजिक, कामगार संघटना, साहित्यिक, पत्रकारिता, शाळेतील मित्र, महाविद्यालयातील मित्र, कुटूंब परिवार अशा विविध पद्धतीने विभागणी करून केलेल्या या समूहात गेली सात वर्षांपासून मी माझ्या सर्व परिचितांशी नित्य संपर्कात आहे. अर्थात रोजच सर्वांचे संदेश पाहता येत नाहीत, पण वेळ मिळेल तेव्हा नक्की पाहता येतात. लेख, कविता हवे तेव्हा वाचता येतात. तेच सर्वसाधारण समूहातील संदेशशोधणे म्हणजे एक दिव्यच असते.

आणखी एक हास्यास्पद प्रकार वाचनात येतो, कोणीतरी एखादी चांगली कविता किंवा उतारा लिहिलेला असतो. त्याच्या सुरुवातीला लिहिलेला मजकूर ‘ही कविता ज्यांनी लिहिली, त्यांना हजार तोफांची सलामी !’ अरे व्वाह ! आवर घाल स्वतःला ! कुठल्या तोफा आणि कुठल्या शब्दांच्या वाफा ! असले प्रकार पाहिले की कीव वाटते आपल्या सुशिक्षित असण्याची ! विषय सोपा आहे, खाली लिहिणाऱ्याचे नांव असेल तर आपणही वाचावे. योग्य असेल तर जरूर पुढे इतरत्र पाठवावे. पण फुकटचे शब्द आणि हवेतील प्रवास करीत शंभर – हजार तोफा कुठे धाडता !

थोडक्यात सांगायचे तर या व्हॉटसॲपचा वापर समाजोपयोगी माहिती व ज्ञान प्रसारासाठी, वैयक्तिक निरोप अथवा भावभावनांसाठी जरूर करावा. समुहात वापरताना सामाजिक जबाबदारीचे भान असावे. उगाचच अर्थहीन मजकूर आणि उठसूठ शुभेच्छांची चित्रफुले विचित्र पद्धतीने पाठवू नयेत. एकच संदेश पुन्हा पुन्हा पाहून नकोसे वाटते. त्यामुळे सरळ सर्वच संदेश काढून टाकले जातात.

व्हॉटसॲप हे माहिती तंत्रज्ञान युगातील खूप प्रभावी साधन आहे. ते वैयक्तिक पातळीवरील संपर्कासाठी माहिती व संदेशाच्या आदान-प्रदानासाठी सुयोग्य वापर केला तर खूप उपयोगी आहे. काही मर्यादा घालून समूहासाठीही उपयोगी आहे मात्र अतिरेकी व अविवेकी वापर टाळावा व या साधनाचा आनंद घ्यावा.

व्हॉटसॲप स्टेटस आणि सेल्फी :

एखाद्या विषयावरील आपली मते, भावना, दिनविशेष किंवा स्वतःची माहिती देण्यासाठी अनेकजण ‘व्हॉटसॲप स्टेटस’चा वापर करतात. आपण आज कुठे गेलो, काय पाहिले याची छायाचित्रे प्रसारित करून जगाला माहिती देण्याच्या प्रयत्नात काही दुर्दैवी प्रकार व घटना घडल्याचे लक्षात आले आहे. इथेही तारतम्य ठेवण्याची गरज असते. मधुचंद्रासाठी गेलेल्या एकाने पत्नीसह आपली छायाचित्रे स्टेटसवर टाकली. त्याच्या मागावर असलेल्या भामट्याने थेट तिकडे जावूनच घातपात केला. दुसऱ्या एका कुटूंबातील सर्वजण सहलीसाठी परगावी गेले. स्टेटसवर मुलांनी छायाचित्रे प्रसारित केली. इकडे माहितीतील व्यक्तीनेच चोरी करून घर लुटून नेले.

वरिल दोन्ही घटनांमध्ये स्टेटसवरिल आततायीपणा कारणीभूत ठरला आहे. म्हणजेच स्वतःच्या आततायीपणाने या संकटांना निमंत्रण दिले आहे. ही छायाचित्रे घरी आल्यावरही प्रसारित करता आली असती. अशी अनेक उदाहरणे देता येतील. विशेषतः तरुण पिढीने अतिउत्साहाला आवर घातला पाहिजे.

या अनुषंगाने आणखी एक उत्साही बाब म्हणजे ‘सेल्फी’. कुठेही गेलात तरी सेल्फी हवीच का ? या सेल्फीने विविध पर्यटन ठिकाणी काही बळी गेल्याचे आपण वेळोवेळी बातम्यांतून वाचले आहे. मध्यंतरी पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळ्याहून पुण्याला येणाऱ्या दोन बहाद्दरांनी तर चालत्या बाईकवर व्हिडीओ काढताना अपघाताला निमंत्रण दिल्याची बातमी फार जुनी नाही. का एवढा अट्टाहास या सेल्फीचा ! मग सावधपणा व सुरक्षितता कुठे हरवून जाते ?

फेसबुक मैत्री : किती खरी

माहिती तंत्रज्ञान युगातील संपर्क साधनांचा विचार करता ‘फेसबुक’ही तितकेच महत्त्वाचे आहे. फेसबुकवरही कुठून कुठून लोक मैत्रीची विनंती (friendship request ) करीत असतात. आपण ती कौतुकाने मान्य करतो आणि जगभरात हजारो मित्र (friends ) असल्याच्या आविर्भावात राहतो. वास्तविक समोर असलेली, काही काळ सहवासात राहिलेली व्यक्तीही आपली चांगली मैत्री निभावण्याची खात्री नसते. तिथे या डोळ्यांआड असलेल्या व्यक्तींच्या मैत्रीबाबत किती विश्वास ठेवायचा? याचाही विचार केला पाहिजे.

मी स्वतः अशी मैत्री मान्य करताना काही पथ्ये पाळलेली आहेत. केवळ फेसबुकवरील आकडा वाढविण्यासाठी मी फेसबुक मैत्री मान्य करीत नाही. त्यामुळे अनेकजण माझ्याकडे प्रतिक्षेत आहेत. सहज म्हणून मी हे सांगतोय. एकतर ती व्यक्ती थोडीफार माहितीतील किंवा आधीच्या मित्रांशी संबंधित (म्युच्यूअल ) असावी. शंकास्पद नांवे, विशेषतः महिलांची अनेक बनावट किंवा फसवी नांवे सहज लक्षात येतात. अशा नावांच्या ‘मैत्री विनंती’स मी कधीच मान्यता देत नाही.

हल्ली नव-श्रीमंतांची एक लाट आहे. त्यांचे राहणीमान, विचार आणि नावांचाही नवा प्रकार लक्षात येतो. उदा. पाटलांचा पक्या, जाधवांचा राणा, चौकाचा राजा वगैरे. अशा नामधारकांची विनंती मी कधीच मान्य करीत नाही. तिसरा प्रकार भावी सरपंच, भावी नगरसेवक, भावी आमदार.. अमूक, तमूक यांनाही मान्यता देत नाही. हा त्यांच्यातील उर्मटपणाच प्रदर्शित झालेला असतो.

जसे व्हॉटसॲप समूहात किंवा स्टेटसवर सर्व माहिती अथवा फोटो प्रदर्शित करणे सदासर्वदा योग्य ठरत नाही. तसेच फेसबुकवरही आपले फोटो किंवा माहिती देताना थोडेफार अवधान राखले पाहिजे. अखेर ती एक ‘आभासी दुनिया’च असते. तिथे खूपच काळजी घ्यायला पाहिजे. फेसबुकवर कोणाशीही मैत्री करताना भान ठेवले पाहिजे. तसेच कौटुंबिक पातळीवरील कोणती छायाचित्रे प्रसारित करावीत, त्याचे काय परिणाम होतील, कुठे नुकसान होईल याचेही भान राखणे आवश्यक आहे, असे मला वाटते.

माहिती तंत्रज्ञानातील व्हॉटसॲप किंवा फेसबुक अशा साधनांचा वापर करताना आपला विवेक व तारतम्य यांचे भान राखले तर निश्चितच हा आनंद द्विगुणीत होईल.

मागिल पंधरा वीस वर्षांतील तंत्रज्ञानातील या क्रांतीने दिलेली फळे चाखताना, आपले मौल्यवान आयुष्य अधिक संपन्न व आनंदी करण्यासाठी, तसेच सामाजिक स्वास्थ्य अधिक चांगले करण्यासाठी या साधनांचा सुयोग्य वापर व्हावा. तारुण्याच्या जोशात काहीही करताना स्वतःचे व कुटूंबाचे नुकसान होवू नये, यासाठी थोडेफार तारतम्य राखावे. विशेषतः तरुण पिढीतील माझ्या सर्व बंधू भगिनींनी याचे भान राखावे आणि स्वतःचे व कुटूंबाचे जीवन अधिक सुंदर करावे, हीच अपेक्षा.
-अरुण बोऱ्हाडे…

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani राष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022 महाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन ? | children day 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj