काही दिवसांत त्यांना उत्तर पाठवणार
पिंपरी- चिंचवडमधील भ्रष्टाचाराच्या आरोपावर किरीट सोमय्या यांचा पलटवार
पिंपरी। लोकवार्ता
पिंपरी – चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटीच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाने करदात्यांच्या तिजोरीवर ५०० ते ७०० कोटीचा दरोडा टाकला असताना राज्यभर ईडी, सीबीआयच्या माध्यमातून उठसूट भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणारे भाजपा नेते किरीट सोमय्या या प्रकरणावर मूग गिळून गप्प का आहेत? सोमय्या यांची ही भूमिका.

दुटप्पी असल्याचे सांगत शिवसेनेने (दि.२२) महापालिकेत उपरोधिक आंदोलन करत प्रतिकात्मक किरीट सोमय्या यांच्याकडे ‘स्मार्ट सिटी’तील घोटाळ्याची फाईल सुपूर्द करण्यात आली. तसेच, महापालिकेतील भ्रष्टाचाराची ‘ईडी’कडे तक्रार करावी आणि चौकशी लावण्याची हिम्मत दाखवावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना ‘स्मार्ट सिटी’चा पिंपरी-चिंचवडमधील घोटाळा खूप मोठा असल्याचे विधान केले होते.
‘स्मार्ट सिटी’ योजनेमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणी पिंपरी- चिंचवडमधील सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षांत होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबायचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी पुन्हा एकदा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत “काही दिवसांत त्यांना उत्तर पाठवणार आहे, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांची उपरोधिकपणे स्तुती करत हल्लाबोलदेखील केला आहे.
“संजय राऊतनी माझे कौतुक केले आभारी आहे. ते म्हणाले “भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरीत्या उघड केली आहेत. हे राष्ट्रावर उपकारच झाले. आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांना तुरुंगात जावे लागले. “मी काही दिवसात त्यांना उत्तर पाठविणार”. असे ट्विट भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.