कोल्हापुरात १३ वर्षानंतर शिक्षक बँकेत सत्तांतर : आजरा तालुक्यातून शिवाजी बोलके यांनी मारली बाजी

लोकवार्ता (कोल्हापूर) : जिल्ह्यातील सर्व शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत राजाराम वरूटे गटाचा सुपडासाफ झाला आहे. अखेर १३ वर्षानंतर शिक्षक बँकेत सत्तांतर झाले आहे. विरोधी राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीने एकतर्फी विजय मिळवित सत्ताधाऱ्यांचा धुव्वा उडवित बँकेवर सत्ता काबीज केली आहे. यंदा तिरंगी लढत होणार असल्याने बँकेवर कोणाची सत्ता येईल, याकडे लक्ष लागले होते. १५ जागांसाठी ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरूटे यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ पॅनेल, शिक्षक संघाचे (थोरात गट) जिल्हा रवी पाटील, शिक्षक समितीचे जोतीराम पाटील, अर्जुन पाटील, कास्ट्राईबचे गौतम वर्धन व संजय कुडूकर, ‘डीसीपीएस’चे मंगेश धनवडे, शिक्षक भारती गजानन यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक पॅनेल व महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी परिवर्तन पॅनेल अशी लढत झाली. १५ दिवस शिक्षकांसह नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता.
रविवारी चुरशीने ९७.७३ टक्के मतदान झाले. मतमोजणीच्या सुरूवातीपासूनच विरोधी राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक पॅनेलने आघाडी घेतली. पहिला विजय करवीरचा एस. व्ही. पाटील यांच्या रुपाने झाला. पन्हाळा, हातकणंगले, शाहूवाडी मतदार संघातील विरोधी पॅनेलच्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडत गेली. विरोधकांनी गुलालाची उधळण करीत भरपावसात जल्लोष केला. अखेरपर्यंत विरोधाची आघाडी कायम राहिली. निवडणुकीत १७ विरुध्द ० अशा फरकाने वरुटे यांच्या सत्तेला सुरूंग लावून विरोधी गटाने बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
गडहिंग्लज तालुक्यातून ९८.८८ %, चंदगड तालुक्यातून ९८.६५, तर आजरा तालुक्यातून ९९.६५ % मतदान झाले असून आजरा तालुक्यातून श्री शिवाजी बोलके यांनी ७११ मतांनी विजय मिळवला.

तालुकानिहाय झालेल्या मतदान, टक्केवारी
करवीर- ९५.८९
शिरोळ- ९८.४९
हातकणंगले- ९८.९४
पन्हाळा- ९६.९२
झाहूवाडी- ९६.०१
राधानगरी- ९७.६४
भुदरगड- ९८.६४
कागल- ९८.०८
गडहिंग्लज- ९८.८८
आजरा- ९९.६५
चंदगड- ९८.६५
गगनबावडा- ९७.१६