दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भाजपची उमेदवारी जाहीर
लोकवार्ता : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना हि उमेदवारी देण्यात आली आहे. २८ जानेवारी २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जगताप कुटूंबियांच्या घरी भेट देत अश्विनी जगताप यांची उमेदवारी निश्चित केली होती.

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या 15 दिवसात अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या जागेसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 2 मार्चला मतमोजणी होईल. ३१ जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
भाजपकडून उमेदवारीसाठी दिवंगत आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनी आणि बंधू शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. दोघांनीही उमेदवारी मागितल्याने पक्षनेतृत्वासमोर पेच निर्माण झाला होता. दोघांनीही भाजपसाठी उमेदवारी अर्ज घेतले होते. त्यामुळे दोघांपैकी नेमकी भाजपची अधिकृत उमेदवारी कोणाला मिळेल याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले होते. अखेरीस भाजप नेतृत्वाने जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अश्विनी जगताप सोमवारी दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.